भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर ५ ऑक्टोबर रोजी सुनावणी

पिंपरी महापालिकेतील विविध प्रकरणांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचा दावा करणाऱ्या भाजपला असे कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याचे उत्तर देत आयुक्तांनी तोंडघशी पाडले होते. मात्र भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या त्या आदेशांच्या प्रतीच त्यांच्याकडे सुपूर्द केल्या. या संदर्भात ५ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार असल्याचे आयुक्तांनी या वेळी स्पष्ट केले.

सांगवीतील पर्यावरणपूरक स्मशानभूमीत बसवण्यात आलेल्या गॅस शवदाहिनीत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा भाजपचा आरोप आहे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी शहर भाजपच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. याशिवाय, भोसरीतील शीतलबाग येथे पादचारी पुलाच्या खर्चात भरमसाट वाढ झाल्याचे प्रकरणही भाजपने मुख्यमंत्र्यांकडे नेले. नाशिक फाटा उड्डाणपुलाच्या कामाच्या चौकशीचीही मागणी करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला या प्रकरणांच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार पालिकेकडून माहिती मागवण्यात आली होती, असे भाजपचे म्हणणे होते. तथापि, एका पत्रकार परिषदेत आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांचे असे कोणतेही आदेश आपल्याला प्राप्त झाले नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे तोंडघशी पडलेल्या भाजपने मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाच्या प्रतीच आयुक्तांकडे सुपूर्द केल्या. शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार, सरचिटणीस सारंग कामतेकर, प्रमोद निसळ यांनी आयुक्तांची भेट घेतली, तेव्हा हे आदेश आपल्याला यापूर्वीच मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सांगवीतील शवदाहिनी प्रकरणाची  सुनावणी पाच ऑक्टोबरला होणार ्असे आयुक्तांनी सांगितले.