पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने नेहमी चिंतेत असणाऱ्या सामान्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आगामी काळात पेट्रोलचे दर 10 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. सरकार एक नवी योजना आखत असून पेट्रोलमध्ये मिथेनॉल मिसळण्याचा विचार करत आहे. नीती आयोगाच्या देखरेखीखाली सरकार देशभरात 15 टक्के मिथेनॉल मिसळलेलं पेट्रोल आणण्याची तयारी करत आहे. यासाठी पुण्यात चाचण्याही सुरु झाल्या आहेत. जर सरकारची योजना यशस्वी झाली तर पेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार आहे.

मिथेनॉल कोळशापासून तयार केलं जातं. सध्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळलं जातं. इथेनॉल ऊसापासून तयार केलं जातं. इथेनॉलसाठी प्रती लीटर 42 रुपये खर्च होतात. तर मिथेनॉलसाठी 20 रुपये प्रती लीटर खर्च येतो. इथेनॉलच्या तुलनेत मिथेनॉल स्वस्त असल्यानेच या पर्यायाचा विचार केला जात आहे. तसंच मिथेनॉलमुळे प्रदूषणही कमी होतं.

नीती आयोगाच्या देखरेखीखाली पुण्यात मिथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांची चाचणी सुरु करण्यात आली आहे. मारुती आणि हुंदाई गाड्यांवर ही चाचणी केली जात आहे. दोन ते तीन महिन्यात चाचण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. जर चाचणी यशस्वी झाली तर मिथेनॉल मिसळलेलं पेट्रोल मिळण्यास सुरुवात होईल.

मिथेनॉलसाठी देशांतर्गत उत्पादन करण्यावर आणि आयातीवर भर देण्यावर सरकारचा जोर असणार आहे. RCF (राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर) आणि GNFC (गुजरात नर्मदा व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन) ची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. चीन, मेक्सिको आणि मध्यपूर्वेतल्या देशांमधूनही मिथेनॉल आयात केलं जाणार आहे.