30 October 2020

News Flash

पिंपरी-चिंचवड : किरकोळ कारणावरून तरुणाची कोयत्याने वार करून हत्या

पाच आरोपींना अटक, दोन जण फरार

पिंपरी-चिंचवडमध्ये वडापावच्या गाड्यावर येऊन सतत शिवीगाळ करत असल्याचा आरोप करत, एका तरुणाची सात जणांनी मिळून कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची, धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाच आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली असून चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, अद्याप दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी दोन पथकं वाकड रवाना केली आहेत. शुभम जनार्धन नखाते (वय- २२) रा.नखाते वस्ती असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.

या गुन्ह्यात ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील (वय- २३) अजय भारत वाकुडे (वय- २३), प्रवीण ज्योतिराम धुमाळ (वय- २१), अविनाश धनराज भंडारी (वय- २३), मोरेश्वर रमेश आस्टे (वय- २१) यांना अटक करण्यात आलेली आहे. तर, अद्याप राज तापकीर आणि प्रेम वाघमारे हे दोघे फरार आहेत. या घटने प्रकरणी मृत तरुणाचे वडील जनार्धन आत्माराम नखाते (वय- ५२), यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या घटनेतील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील आणि अजय भारत वाकुडे यांचा तापकीर चौक येथे वडापावचा गाडा असून मृत शुभम आणि त्यांच्यात पूर्वीचे वाद होते. यावरून शुभम हा आरोपी ज्ञानेश्वर आणि अजयला वडापावच्या गाड्यावर येऊन नेहमी शिवीगाळ करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात पुन्हा वाद झाले होते. हे सर्व प्रकरण मिटवण्यासाठी राज तापकीर याने शुभमला फोन करून बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास बोलावले होते, अस फिर्यादीत म्हटले आहे. शुभम दुचाकीवर तापकीर चौकातील धोंडिराज मंगल कार्यालयात आला. तेव्हा, त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली आणि आरोपींनी शुभमवर कोयत्याने वार केले. यानंतर शुभम रक्ताच्या थारोळ्यात पडला पडल्याने आरोपींनी घटनस्थळावरून पळ काढला.

दरम्यान, वाकड पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही तासांतच मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक करण्यात आली. यातील दोघेजण फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 2:57 pm

Web Title: pimpri chinchwad a youth was stabbed to death for a trivial reason msr 87 kjp91
Next Stories
1 ‘खडकवासला’त वीजनिर्मिती बंद
2 Coronavirus : सक्रिय बाधितांचे प्रमाण २७ टक्यांवरून १९ टक्यांवर
3 स्वच्छ सेवकांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा प्रस्ताव
Just Now!
X