पिंपरी-चिंचवडमधील क्वारंटाइन सेंटरमध्ये असलेल्या अनेक नागरिकांनी, महानगर पालिका प्रशासन सुविधा पुरवत नसल्याचा आरोप करत आज गोंधळ घातला.  यावेळी अनेक  नागरिक क्वारंटाइन सेंटरमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, गेटला कुलूप असल्याने त्यांना बाहेर पडता आलं नाही. तर, महानगर पालिकेच्या प्रशासनाने नागरिकांचा आरोप फेटाळू लावला आहे.

पिंपरी-चिंचवडच्या मोशी परिसरात क्वारंटाईन सेंटर असून तिथे करोना संशयितांना ठेवलं जातं आहे. एकूण २१० नागरिक त्या ठिकाणी क्वारंटाइन करण्यात आलेले आहेत. मात्र, तेथील नागरिकांचे अहवाल हे उशिरा येत असून जेवण आणि इतर सुविधा मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आज सकाळी येथील नागरिकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी सर्वांनी गोंधळ करत सेंटर बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गेटला कुलूप असल्याने ते बाहेर पडू शकते नाहीत.

हा सर्व प्रकार सामाजिक कार्यकर्ते मनोज कांबळे यांनी समोर आणला आहे. दोन दिवसांपूर्वी देखील नागरिकांनी असाच बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी समजावून त्यांना पुन्हा गैरसोय होणार नाही म्हणून गप्प केलं होतं, असं तेथील नागरिकांनी सांगितले आहे. परंतु, आज पुन्हा अनेकांनी  बाहेर पडण्यासाठी गर्दी केल्याने, सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.

“नाष्टा, जेवण, चहा वेळेवर दिला जात आहे. अहवाल येण्यास उशीर होत असल्याने नागरिकांमध्ये गोंधळ आहे. गेट लावण्याच्या मीच सूचना दिल्या होत्या, आतमध्ये अनेक जण जातात.” असे महानगर पालिका प्रशासनाचे प्रशांत जोशी यांनी सांगितले आहे.

तर, करोनाचा अहवाल लवकर येत नाही, जेवणाची व्यवस्था नाही, निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे, असा आरोप जिशान शेख या नागरिकाने केला आहे.