अनेकदा विवाह सोहळ्यात मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. तर अनेकदा काही बड्या व्यक्तींनाही लग्नसमारंभात आमंत्रित करून दिखावा केला जातो. देशसेवेसाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या जवानांचा कोणी विवाह समारंभात सत्कार केला नसेल हे कटू सत्य आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये एका निवृत्त जवानाने कारगिल युद्ध आणि पाकिस्तानच्या कुरघोड्यांमध्ये जखमी झालेल्या (दिव्यांग) जवानांना आमंत्रित करून त्यांचा आदर सत्कार करत एक आगळावेगळा सोहळा पार पडला. त्यामुळे या विवाह सोहळ्याला देशभक्तीचा रंग चढला होता. धनेश्वर भोस अस या निवृत्त जवानाचे नाव आहे.

निवृत्त जवान धनेश्वर यांना युद्धादरम्यान आपला एक पाय गमवावा लागला होता. १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात शत्रूशी दोन हात करताना भू-सुरुंगाचा स्फोट होऊन ते गंभीर जखमी झाले होते. या घटनेत त्यांचा उजवा पाय निकामी झाला आहे. त्यांना जवानांविषयी खूप प्रेम आणि आदर आहे. त्यामुळेच त्यांनी बड्या व्यक्तींना किंना नेतेमंडळींना आमंत्रित न करता देशसेवा बजावताना जखमी झालेल्या जवानांना आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्यात बोलवून त्यांचा सन्मान केला. प्रियांका असं त्यांच्या मुलीचे नाव असून वैभव असे वराचे नाव आहे. त्यांच्या विवाह सोहळ्याला दहा जवानांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थित नातेवाईकांच्या गालावर तिरंगा साकारण्यात आला होता. त्यामुळे या विवाह सोहळ्यात देशभक्ती अधिकच गडद होत गेली.

खर तर मंगलाष्टकं या विवाह सोहळ्यात असतातच. परंतु, भोस यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यादरम्यान राष्ट्रगीत लावण्यात आले होते. सर्व पाहुण्यांनी सोहळ्यात सहभागी झालेले दहा जवानांना कडक सॅल्युट केला. यावेळी जवानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आमदार, खासदार, मंत्री यांचा सत्कार असतोच. पण, प्रत्येक नागरिकाने आमच्यासारख्या जवानांचा अशा पद्धतीने सन्मान केला तर उत्साह वाढेल, प्रोत्साहन मिळेल. आम्ही देशासाठी कर्तव्य बजावत असतो. आपल्यासाठीही कोणीतरी आहे ही भावना सर्वांच्या मनात निर्माण होईल. यामुळे खूप समाधान वाटत आहे असं मत निवृत्त जवान रामदास मोरे यांनी व्यक्त केलं.

लग्नातील इतर खर्च टाळून जवानांसाठी मदत करावी. आपला इतर खर्च होतच राहतो. अशा कार्यक्रमातून जवानांना प्रोत्साहन मिळेल असं नवरदेव वैभव म्हणाले. यावेळी नववधू प्रियांका यांना मन भरून आले आणि त्यांनीदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या. आमचं बालपण त्यांनी पाहिलेल नाही, १५ ते २० वर्ष माझे बाबा माझ्यापासून देशसेवेसाठी दूर होते. असा वेगळा उपक्रम प्रत्येक करावा, प्रत्येक जवनांचा सन्मान केलाच पाहिजे असं त्या म्हणाल्या. काही ही असो पण या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची चर्चा पिंपरी-चिंचवड शहरात होत आहे. भोस यांचं कौतुक होत असून त्यांनी समाजात एक आदर्श घालून दिला आहे.

जवानांचा सत्कार 
यावेळी रामदास मोरे, शंकर लाखे, गोविंद बिरादार, व्ही.एम सुरवसे, पांडुरंग यादव, बसवराज पट्टनशेड्डी, विष्णू सुर्वे, जितेंद्र सिंग, अमित यादव, कलप्पा माने, साईनाथ पौळ, कर्नल भार्गव हे या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी या सर्वांचा सत्कारदेखील करण्यात आला.