21 March 2019

News Flash

शहरबात पिंपरी : दोन दशकांच्या प्रवासात राष्ट्रवादीला अंतर्गत कलह आणि गटबाजीचा शाप

अंतर्गत कलह आणि गटबाजीचा शाप असल्याने राष्ट्रवादीची घसरण होत गेली, त्याचे दृश्य परिणाम आज दिसून येतात.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण झाली, त्याचे औचित्य साधून पुण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन झाले. स्वबळावर सत्ता मिळवता न आलेल्या राष्ट्रवादीकडे अर्धसत्तेचे मानकरी म्हणून पाहिले जाते. बारामतीखालोखाल पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा अभेद्य बालेकिल्ला होता, तोही आता राहिला नाही. आतापर्यंतच्या वाटचालीत शहर राष्ट्रवादीत अनेकदा उलथापालथ झाली. अंतर्गत कलह आणि गटबाजीचा शाप असल्याने राष्ट्रवादीची घसरण होत गेली, त्याचे दृश्य परिणाम आज दिसून येतात.

पिंपरी-चिंचवडच्या एकूणच राजकारणाचा धावता आढावा घेतला, तर हा पट्टा कायम पवार काका-पुतण्यांना मानणारा असल्याचे दिसून येते. सुरूवातीला शरद पवार येथील कारभार पाहत होते. नंतर १९९१ च्या सुमारास त्यांनी अजित पवार यांना शहराच्या राजकारणात आणले. तेव्हापासून आजपर्यंत अजित पवार हे नाव पिंपरी-चिंचवडच्या केंद्रस्थानी आहे. राष्ट्रवादीची स्थापना झाली, तेव्हा पिंपरीतही राजकीय उलथापालथ झाली. त्या काळात रामकृष्ण मोरे यांचाही शहरात प्रभाव होता, त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी दोन्हीकडे कार्यकर्त्यांची विभागणी झाली होती. मोठा गट राष्ट्रवादीत आला, तरीही काही जण  निष्ठेने काँग्रेसमध्ये राहिले. शहरातील दिग्गज नेत्यांचा समावेश असल्याने राष्ट्रवादीची ताकद जास्त होती. पहिल्या शहराध्यक्षपदाचा मान भोसरीतील वसंत लोंढे यांना मिळाला. त्यानंतर, आझम पानसरे, लक्ष्मण जगताप, योगेश बहल, संजोग वाघेरे यांनी त्या पदावर काम केले. शहराध्यक्ष कोणीही असला तरी पक्षातील सर्व निर्णय पवारच घेत होते.

पिंपरी-चिंचवडचा समावेश भल्या मोठय़ा हवेली मतदारसंघात होता, तेव्हा शिवसेनेचे गजानन बाबर हवेलीचे प्रतिनिधित्व करत होते. पुढे, बाबर यांचा पराभव करत राष्ट्रवादीचे विलास लांडे निवडून आले. तेच लांडे शिरूर लोकसभेच्या िरगणात उतरले असता, त्यांचा शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव यांच्याकडून दारूण पराभव झाला. मावळ लोकसभेतून राष्ट्रवादीचे आझम पानसरे हे बाबर यांच्याकडून पराभूत झाले. लांडे व पानसरे यांना पक्षांतर्गत गटबाजीचा फटका बसला. २००९ मध्ये शहरात तीन विधानसभा मतदारसंघ झाले, तेव्हा पिंपरीतून राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे निवडून आले. लांडे भोसरीतून तर लक्ष्मण जगताप चिंचवड मतदारसंघातून बंडखोरी करून निवडून आले. वरवर अपक्ष म्हणून मिरवणारे दोन्ही अपक्ष आमदार नंतर राष्ट्रवादीतच आले. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना लांडे काँग्रेसमध्ये जातील, असे वातावरण होते. मात्र, पवारप्रेमाचा दावा करत ते राष्ट्रवादीत राहिले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपापले गट तयार करून स्वत:च्या समर्थकांना ताकद देण्यातच धन्यता मानली. त्यामुळे पक्षाचे वेळोवेळी नुकसानच झाले. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने घवघवीत यश मिळवले, त्यात लांडे, जगताप, पानसरे अशा स्थानिक सुभेदारांचे योगदान महत्त्वाचे होते. पुढे, एकेक करत हेच सुभेदार पक्षातून बाहेर पडले. शेतकरी कामगार पक्षाशी (शेकाप) आघाडी करत जगताप मावळ लोकसभेच्या िरगणात उतरले आणि शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्याकडून पराभूत झाले. पक्षांतर्गत लाथाळ्यांमुळे मावळसाठी राष्ट्रवादीला उमेदवार मिळू शकला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली. तेव्हा राष्ट्रवादीच्या बहुतांश कार्यकर्त्यांनी घडय़ाळ सोडून शिवसेनेचा बाण चालवला. पुढे जाऊन जगताप यांनी राष्ट्रवादीशी अधिकृतपणे काडीमोड घेत भाजपशी घरोबा केला. त्याचपद्धतीने, अपक्ष निवडून आलेल्या आमदार महेश लांडगे यांनी भाजपचा रस्ता धरला. माजी महापौर आझम पानसरे यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवक व ताकतीच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे एकेकाळी अतिशय केविलवाणी अवस्था असलेल्या भाजपची ताकद प्रचंड वाढली.

एकीकडे राष्ट्रवादीला खड्डा पडत असताना काँग्रेसचे तत्कालीन नेते भाऊसाहेब भोईर व त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तत्पूर्वी, हनुमंत गावडे यांनी विकास आघाडीसह राष्ट्रवादीत प्रवेश करत अजित पवारांचे नेतृत्व स्वीकारले होते. राष्ट्रवादीने १५ वर्षांच्या प्रवासात अनेक चढउतार पाहिले. सत्तेच्या माध्यमातून शहराचा कायापालट केला. मात्र, याच कालावधीत भ्रष्ट कारभाराने कळस गाठला. त्याचाच परिणाम म्हणून नागरिकांनी राष्ट्रवादीला घरी बसवून भाजपच्या हातात सूत्रे दिली. वीस वर्षांच्या वाटचालीत राष्ट्रवादीला अंतर्गत कलह आणि गटबाजीचा शाप मिळाला असून, अजूनही परिस्थिती  फारशी बदललेली नाही.

भाऊ गटाकडून दादा गटाकडे

पिंपळे गुरव-नवी सांगवीचे अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप म्हणजे भाजपचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे खंदे समर्थक, अशी आतापर्यंतची ओळख होती. साईबाबा आणि भाऊ ही दोनच दैवते, असे ते जाहीरपणे सांगत होते. मात्र, महापालिका निवडणुकीपासून त्यांच्यात बिनसले. नवनाथ यांनी भाजप पॅनेलच्या विरोधात दंड थोपटताना स्वत:चे चुलते व भाजपचे उमेदवार राजेंद्र जगताप यांचा पराभव केला. काका-पुतण्याची लढत आमदारांसाठी मोठी डोकेदुखी ठरली.

कोणीजिंकला तरी त्याचा आमदारांना त्रास होणार होता आणि तसेच झाले. दोघेही विरोधात गेले. राजेंद्र यांनी भाजपला सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. नवनाथ जगताप काही काळ भाजपचे सहयोगी नगरसेवक म्हणून राहिले. मात्र, काही कालावधी गेल्यानंतर नवनाथ व आमदारांमध्ये पूर्वीसारखे सख्य राहिले नसल्याचे सर्वाच्या लक्षात आले.

नवनाथ यांच्या वाढदिवशी त्यांच्या समर्थकांनी भरपूर पोस्टरबाजी केली, तेव्हा जाहिरातफलकांमध्ये ‘भाऊ’ नव्हते. त्याऐवजी, अजित ‘दादा’ पवार यांचे छायाचित्र होते. अपक्ष नगरसेवक असा ठळक उल्लेखही होता. आमदार जगताप विरोधकांना त्यामध्ये आवर्जून स्थान देण्यात आले होते. त्यामुळे नवनाथ यांनी ‘भाऊ’ गटाकडून ‘दादा’ गटाकडे प्रस्थान केल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.

balasaheb.javalkar@expressindia.com

First Published on June 13, 2018 2:28 am

Web Title: pimpri chinchwad ncp