इच्छेविरुद्ध नियुक्ती झाल्याने तुकाराम मुंढे यांचा पदभार स्वीकारण्यास नकार

पिंपरी भाजपमध्ये बाहेरील गर्दी वाढली, तसे पक्षात गटातटाचे राजकारण जोर धरू लागले आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदासाठी एका माजी शहराध्यक्षाचे नाव जवळपास निश्चित झाले होते. मात्र, अध्यक्षपदासाठी तुकाराम मुंढे यांचे नाव पुढे आणून या नेत्याचा पत्ता कापण्याची राजकीय खेळी भाजप नेत्यांनीच केली. मुळातच पिंपरी-चिंचवडमध्ये येण्यास उत्सुक नसलेल्या मुंढे यांनी, दोन आठवडय़ानंतरही नवा पदभार स्वीकारला नसल्याने पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी सुरू आहेत, याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडे पिंपरी प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार होता. दोन आठवडय़ापूर्वी अनपेक्षितपणे तुकाराम मुंढे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. मुंढे यांच्या नियुक्तीमुळे शहरात संमिश्र प्रतिक्रिया उमटली. एका बाजूला त्यांचे स्वागत करण्यात आले. दुसरीकडे, त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीची माहिती असल्याने नागरिकांमध्ये धडकी भरल्याचेही दिसून आले. दरम्यानच्या कालावधीत शहर भाजप वर्तुळात झालेल्या काही नाटय़मय घडामोडी आता उजेडात येऊ लागल्या आहेत. नियुक्ती होऊनही मुंढे यांनी प्राधिकरण अध्यक्षपदाचा पदभार अद्याप स्वीकारलेला नाही. विभागीय आयुक्त या नात्याने दळवी हेच प्राधिकरणाचे कामकाज पाहत असल्याची माहिती पुढे आली आहे. मुळातच मुंढे प्राधिकरण अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास उत्सुक नव्हते. मात्र, पिंपरीतील राजकीय गणिते लक्षात घेऊन त्यांना येथे आणण्याचा डाव भाजप नेत्यांनीच खेळला.

गोपीनाथ मुंडे परिवाराशी घरोबा असलेल्या एका पदाधिकाऱ्याचे नाव प्राधिकरण अध्यक्षपदासाठी निश्चित झाले होते. काही तांत्रिक बाबींची पूर्तता होणे बाकी होते म्हणून अधिकृत घोषणा झाली नव्हती. त्याची कुणकुण लागल्याने ठरवून त्यांचा पत्ता कापण्यात आल्याचे सांगण्यात येते. शहराध्यक्षपदावर असताना या पदाधिकाऱ्याचा भलताच रुबाब होता. पक्षातील सर्वोच्च नेत्याच्या पिंपरीतील सभेचे अध्यक्षस्थान भूषवण्याची संधी त्यांना मिळाली होती. बाहेरील नेत्यांचा भरणा भाजपमध्ये येण्यास सुरूवात झाली, तसतसे त्यांचे महत्त्व कमी-कमी होत गेले. निवडून येण्याची खात्री नव्हती म्हणून पालिका निवडणुकीच्या िरगणात ते उतरले नाहीत. पक्षातील गटबाजीमुळे स्वीकृत नगरसेवकही होता आले नाही. उचापती स्वभाव, दोन्ही दगडावर हात, राजकीय कोलांटउडय़ा त्यांना भोवल्या. जुने सहकारी सोडून गेल्याने राजकीय सोयीसाठी त्यांनी नवा ‘दोस्ताना’ केला. त्यांच्याच माध्यमातून विविध मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांपर्यंत ‘फिल्डिंग’ लावली. बीड, मुंबई वाऱ्या करून सगळे जमवून आणले.मात्र, पक्षातील नेत्यांनीच पंख कापले. अशा परिस्थितीत, प्राधिकरण अध्यक्षपदाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.