पिंपरी : पिंपरी पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेमधील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाढत्या बेशिस्तीला पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी मंगळवारी चाप लावला. गुन्हे शाखेतील पन्नास टक्के बेशिस्त पोलिसांच्या सक्तीने बदल्या करण्यात आल्या. त्या बरोबरच विनंती अर्ज केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी आयुक्त पद्मनाभन यांनी प्रथमच ‘बदली दरबार’चे आयोजन केले होते. या दरबारात पाचशे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. आयुक्तांनी बदली करण्यापेक्षा कर्मचाऱ्यांकडूनच बदल्या करण्याचा नवीन पायंडा पाडून बदल्यांमध्ये पारदर्शीपणा आणण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

कमी मनुष्यबळामुळे पिंपरी पोलीस आयुक्तालयामध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी केले होते. त्यानुसार राज्याच्या अनेक जिल्ह्य़ातून पोलीस कर्मचारी पिंपरी आयुक्तालयामध्ये रुजू झाले आहेत. रुजू झाल्यानंतर अनेकांना मनासारखे पोलीस ठाणे न मिळाल्यामुळे त्यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केले होते. त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या विनंती अर्जानुसार बदली करण्यासाठी पोलीस आयुक्तालयामध्ये मंगळवारी बदली दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पुरुष आणि महिला कर्मचारी मिळून पाचशे जणांनी भाग घेतला. पंधरा पोलीस ठाणी, गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक, अमली पदार्थ विरोधी पथक, मुख्यालय, आयुक्तालय, वाहतूक शाखा आदी विभागातील मिळून पाचशे पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस आयुक्तांकडे बदलीसाठी अर्ज केला होता.

बदलीसाठी विनंती अर्ज केलेल्या प्रत्येक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्यांना रांगेत उभे करुन प्रत्येकाच्या आवडीनुसार बदलीची ठिकाणे देण्यात आली. पोलीस आयुक्तांनी नव्याने निर्माण केलेल्या पाच पोलीस चौक्यांमध्ये जाण्यासाठी कर्मचारी फारसे उत्सुक नव्हते. त्याठिकाणी सक्तीने पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. वय, तीन वर्षांचा निकष, शारीरिक सशक्तता, पूर्वीचा कार्य अहवाल आदी निकष पाहून कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये बेशिस्ती वाढली होती. त्यामुळे त्या विभागातील पन्नास टक्के कर्मचाऱ्यांच्या सक्तीने बदल्या करण्यात आल्या.