पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय

पिंपरी-चिंचवडसाठी पोलीस आयुक्तालय व्हावे, या मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट अनुकूल आहेत. वेळोवेळी त्यांनी याबाबतची घोषणाही जाहीर समारंभातूनही केली आहे. मात्र सर्व सत्तास्थाने मुख्यमंत्र्यांकडे असताना आयुक्तालयाबाबत नेमके अडले कुठे? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शनिवारी (१२ ऑगस्ट) पिंपरीत येत असून ते पिंपरी आयुक्तालयाची घोषणा करणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवडचा वाढता विस्तार आणि गुन्हेगारी घटनांच्या पाश्र्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची मागणी स्थानिक राजकीय नेत्यांनी लावून धरली होती. गेल्या काही वर्षांपासून याबाबत सरकार दरबारी पाठपुरावा करण्यात येत होता. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात शुक्रवारी गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनीही या विषयावरील लक्षवेधीवर उत्तर देताना याबाबतची माहिती दिली. आमदार गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, राहुल कुल, शरद सोनावणे यांनी याबाबत अधिवेशानात लक्षवेधी सूचना मांडली होती. या सूचनेवर उत्तर देताना रणजित पाटील म्हणाले, की पिंपरी-चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी, शहराचा वाढता विस्तार विचारात घेऊन पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र आयुक्तालयाची मागणी करण्यात येत आहे. वर्षभरापूर्वी याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना देण्यात आले होते. त्यानुसार या बाबतचा अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला आहे. कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

गेल्या वर्षी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. त्या वेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पिंपरीसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पुणे पोलिसांकडून याबाबतचा अहवाल देखील मागविण्यात आला होता. मुख्यमंत्री पिंपरीत येऊन घोषणा करतील, अशी चर्चा होती. मात्र तशी घोषणा झाली नाही.

पिंपरीसाठीच्या नियोजित पोलीस आयुक्तालयाची हद्दनिश्चिती पुणे पोलिसांकडून करण्यात आली आहे. नव्या पोलीस आयुक्तालयाची जागा देखील निश्चित करण्यात आली आहे. नवीन हद्दीचा नकाशा पोलिसांकडून तयार करण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडून नवीन आयुक्तालयासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्याचे काम सुरू असून पोलीस आयुक्तालयाची घोषणा झाल्यानंतर तातडीने एक, दोन महिन्यांत स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित होईल, अशी माहिती पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने दिली.

नवीन पोलीस आयुक्तालयाची हद्द

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पिंपरी-चिंचवड शहरासह चाकण, तळेगाव दाभाडे, देहूरोडचा काही भाग समाविष्ट करण्यात आला आहे. ग्रामीण पोलिसांचा काही भाग नवीन पोलीस आयुक्तालयाला जोडण्यात येणार आहे. वाढती गुन्हेगारी तसेच लोकसंख्येचा विचार करून नवीन आयुक्तालयासाठी किमान पाच हजार पोलिसांची आवश्यकता भासणार आहे. सुरुवातीच्या काळात सध्या असलेल्या मनुष्यबळात पोलीस आयुक्तालयाचे कामकाज सुरू होईल. त्यानंतर टप्याटप्याने मनुष्यबळ वाढवण्यात येईल. पोलीस मुख्यालय तसेच नवीन मोटार वाहन विभाग उभारण्याचे काम आयुक्तालय स्थापन झाल्यानंतर एक ते दोन वर्षांत पूर्ण होईल.