पिंपरी महापालिका अधिकाऱ्यांना आयुक्तांचे आदेश

स्थायी समिती सभेत नगरसेवक ऐनवेळी एखादा विषय उपस्थित करतात. तेव्हा माहिती घ्यावी लागेल, असे सांगून अधिकारी वेळ मारून नेतात, असे नेहमीच घडते. तथापि, िपपरी पालिका अधिकाऱ्यांना यापुढे तसे करता येणार नाही. एखादा विषय उपस्थित झाल्यानंतर त्याची माहिती पुढील बैठकीपूर्वी संबंधित नगरसेवकांना दिली गेली पाहिजे, असे आदेश आयुक्त दिनेश वाघमारे यांनी विभागप्रमुखांना दिले आहेत.

महापालिका सभा असो की स्थायी समितीची बैठक; सदस्यांकडून ऐनवेळी एखादा मुद्दा किंवा विषय उपस्थित करण्यात येतो. तेव्हा संबंधित अधिकारी जागेवर नसतात किंवा त्यांच्याकडे त्या विषयाची माहिती नसते. अशावेळी माहिती घेऊन उत्तर देऊ, अशी भूमिका अधिकारी घेतात. पुढे ती माहिती मिळत नाही आणि विषय उपस्थित करणारा नगरसेवकही पाठपुरावा करत नाही, असे दिसून येते. िपपरी पालिका स्थायी समितीत असे प्रकार वारंवार होऊ लागल्याने काही सदस्यांनी आयुक्तांकडे तक्रार केली, त्याची दखल घेऊन आयुक्तांनी विभागप्रमुखांना नुकतेच आदेश दिले आहेत. त्यानुसार, स्थायी समितीत उपस्थित केलेल्या विविध मुद्दय़ांची यादी करून त्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांची उत्तरे असणारा कार्यवाही अहवाल सदस्यांना देण्यात येणार आहे.  पाच जुलैच्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या मुद्दय़ांचा अहवाल सदस्यांना देण्यात आला आहे. धनंजय आल्हाट, नारायण बहिरवाडे, शुभांगी लोंढे, सुमन नेटके, संदीप चिंचवडे, अनिता तापकीर यांनी उपस्थित केलेल्या विविध विषयांची सविस्तर माहिती अहवालात देण्यात आली आहे. शहरात रस्तोरस्ती पडलेले खड्डे पुढील बैठकीपर्यंत बुजवण्यात यावेत, असे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष डब्बू आसवानी यांनी शहर अभियंत्यांना दिले होते, त्यासंदभातील उत्तर मात्र देण्यात आलेले नाही.