पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांचे वक्तव्य; ‘अभाविप’चे प्रदेश अधिवेशन

‘भारताला आपण धर्मशाळा करणार आहोत का, जो येईल तो येथे राहणार का, याचा विचार करून हे आव्हान आपल्याला स्वीकारावेच लागेल. भारतात ‘भारतमाता की जय’ म्हणावेच लागेल, भारत माता की जय म्हणणारेच देशात राहतील,’ अशा शब्दात पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांनी शनिवारी सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या वादाबाबत वक्तव्य केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५४व्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाचे उद्घाटन प्रधान यांच्या हस्ते झाले. गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा, महापौर मुरलीधर मोहोळ, अभाविपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. प्रशांत साठे, प्रदेश अध्यक्ष प्रा. सारंग जोशी, अधिवेशनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, स्वागत सचिव राजेश पांडे  या वेळी उपस्थित होते.

सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला देशभरात होत असलेल्या विरोधाच्या पाश्र्वभूमीवर प्रधान यांनी उपस्थित विद्यार्थी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ‘देशाची बौद्धिक ठेकेदारी आपल्याकडे आहे असे काहींना वाटते. सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला देशभरातील विद्यापीठे, शिक्षण संस्थांतून विरोध केला जात आहे. या कायद्यांबाबत केल्या जाणाऱ्या अपप्रचाराला अभाविपने उत्तर दिले पाहिजे,’ असे प्रधान म्हणाले.

‘जिंकायची इच्छाशक्ती असलेल्यालाच नशीबाची साथ’

शारीरिक आव्हानांवर मात करून एव्हरेस्ट सर केलेल्या गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा यांनी विद्यार्थ्यांना एव्हरेस्ट चढाईचा अनुभव कथन केला. ‘आजच्या काळात सर्वसामान्य नागरिकांसमोर स्वतच्या आव्हानांचे एव्हरेस्ट आहे. त्या आव्हानांना ते रोजच्या रोज सामोरे जात असतात. मात्र, ज्याच्यात जिंकायची इच्छाशक्ती असते, नशीब त्यालाच साथ देते. प्रत्येकाने स्वतसमोर एक लक्ष्य ठेवले पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे; भलेही लोकांनी आपल्याला वेडे ठरवले तरी हरकत नाही. आपले लक्ष्य गाठण्यासाठी स्वतच स्वतला प्रोत्साहित करण्याची गरज आहे,’ असे सिन्हा म्हणाल्या.