News Flash

प्लँचेट प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलीस महासंचालकांमार्फत सुरू

या तपासाचा अहवाल आठ दिवसांमध्ये मिळण्याची शक्यता असून त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली.

| July 26, 2014 03:20 am

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी प्लँचेटचा आधार घेतल्याप्रकरणी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत तपास करण्यात येत आहे. या तपासाचा अहवाल आठ दिवसांमध्ये मिळण्याची शक्यता असून त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने तळजाई पठारावर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी पाटील बोलत होते. या प्रसंगी महापौर चंचला कोद्रे, खासदार वंदना चव्हाण, आमदार भीमराव तापकीर, बापूसाहेब पठारे, माधुरी मिसाळ, जयदेव गायकवाड, अंकुश काकडे आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, की प्लँचेट प्रकरणाचा अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. या प्रकारात तथ्य आढळून आल्यास अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल. या गुन्ह्य़ात अटक केलेल्या आरोपींनीही प्लँचेटच्या आधारे अटक केल्याची तक्रार केली आहे. याचा तपासही केला जाईल. डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचा तपास सीबीआयकडे गेल्याची शासनाला खंत वाटत आहे. तरीही राज्य शासनापुढे तपासाचे आव्हान आहे, असेही पाटील यांनी नमूद केले.
‘मित्र पक्षांनी बळ किती राहिले हे तपासावे’
मित्र पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करीत आहेत. मात्र, त्यांनी अगोदर स्वत:चे बळ किती राहिले हे तपासावे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांकडून स्वबळावर लढण्याची मागणी होत आहे. परंतु या संदर्भात पक्ष पातळीवर विचार आणि अभ्यास करायची गरज आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळेस जागा वाटपाबाबत काँग्रेसने जो निकष लावला होता. तोच निकष या वेळी लावला पाहिजे. आमचे खासदार जास्त असल्याने त्या तुलनेत आम्हाला जास्त जागा मिळाव्यात, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 3:20 am

Web Title: planchate dr narendra dabholkar r r patil crime
Next Stories
1 कागदवेचक कर्मचाऱ्यांच्या मुलांची शिष्यवृत्ती रोखली
2 कलेद्वारे अर्थ देणाराच खरा प्रतिभावंत – पं. हृदयनाथ मंगेशकर
3 आयटी कंपनीकडून १०३ अभियंत्यांची चौऱ्याऐंशी लाख रुपयांची फसवणूक
Just Now!
X