पुणे : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील काही भागात संपूर्ण टाळेबंदी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या बाबतची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे, मात्र संबंधित भागातील रुग्णालये, औषधे विक्री दुकाने, दूध विक्री, किराणा माल, भाजीपाला दुकाने अशा अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार आहेत. परंतु, या भागातील नागरिकांनी घराबाहेर पडणे, आपल्या भागातून दुसऱ्या परिसरात जाणे आणि वाहतुकीवर संपूर्ण निर्बंध घालण्यात आले आहेत.
संबंधित भागात संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. टाळेबंदी केलेल्या भागात करोना बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे परिसरातील अन्य नागरिकांनाही संसर्ग होण्याच्या शक्यतेने प्रशासन याबाबत अधिक सक्रिय झाले आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने शहरातील काही भागात संपूर्ण टाळेबंदी केल्याच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक झाली. संबंधित भागातील दूध, भाजीपाला, गॅस, औषधे आदींचा पुरवठा सुरू राहील. परिसरातील स्वच्छतागृहे, गल्लीबोळ निर्जंतुकीकरण करण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे. डॉक्टर, अत्यवस्थ रुग्ण, अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना या टाळेबंदीतून सूट देण्यात येणार आहे. संपूर्ण टाळेबंदी केलेल्या भागात नागरिकांनी संचारबंदीचे आदेश पाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे आदी या वेळी उपस्थित होते.
संपूर्ण टाळेबंदी केलेल्या भागातील नागरिकांमध्ये भीती, संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी स्वयंसेवी संस्था, पोलीस प्रशासनाकडून समुपदेशन करून प्रशासन आपल्या पाठीशी असल्याची भावना लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या.
शहरात संपूर्ण टाळेबंदी केलेल्या भागातील अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार आहेत. या भागातील नागरिकांना घराबाहेर पडणे किंवा टाळेबंदी केलेल्या भागात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संपूर्ण टाळेबंदी केलेल्या भागातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा हवी असल्यास शहर तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय, स्थानिक पोलीस ठाण्यांशी संपर्क करावा.
– तृप्ती कोलते, शहर तहसीलदार
संपूर्ण टाळेबंदीत अत्यावश्यक सेवांसाठी संपर्क
शहराच्या काही भागात संपूर्ण टाळेबंदी केल्याने या भागातील नागरिकांना अत्यावश्यक सेवेसाठी पोलीस प्रशासनाकडून १०० (टोल फ्री), ९१४५००३१००, ९१६८००३१००, ८९७५९५३१०० आणि ८९७५२८३१०० या क्रमांकांवर किंवा punecitypolice.grievance@gmail.com यावर संपर्क साधावा. तसेच शहर तहसीलदार कार्यालय ०२०-२४४७२८५०, शहर उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख ८२७५००६९४५ किंवा हवेली उपविभागीय अधिकारी सचिन बारावकर ९८२२८७३३३३ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.