पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळील वलवण येथे शनिवार मध्यरात्री रात्री एकाच ठिकाणी पंधरा मिनिटांच्या अंतराने घडलेल्या दोन घटनांमध्ये चोरटय़ांनी दोन मोटारींमधील प्रवाशांची लुटमार करून पावणेदोन लाखांचा ऐवज लुटून नेला. या घटनांनी द्रुतगती मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनेतील दोन्ही मोटार प्रवासी वाहतुकीतील असून, त्यापैकी एका चालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
घटनेतील एका मोटारीचा चालक सुधीर माणिक शिंदे (वय २२, रा. वाशी, नवी मुंबई) याने फिर्याद दिली आहे. लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील रहिवासी सुधीर शिंदे हे इतर काही मंडळींना घेऊन दौंड येथील पिंपळगाव येथे मोटारीने निघाले होते. द्रुतगती मार्गावर रात्री एकच्या सुमारास वलवण गावाजवळील उड्डाणपुलाजवळ लघुशंकेसाठी त्यांनी मोटार थांबविली. मोटार उभी असताना काही वेळातच त्या ठिकाणी तोंडाला पांढरे रुमाल बांधून वीस ते पंचवीस वयोगटातील तीन व्यक्ती आल्या. ‘इथे गाडी कशाला थांबवली’ असे म्हणत त्यांनी चाकूचा धाक दाखवला. चोरटय़ांनी शिंदे यांच्या हातातील सोन्याची अंगटी व रोख रक्कम काढून घेतली. तसेच मोटारीतील इतर प्रवाशांच्या अंगावरील सोने व त्यांच्याकडील रोकड असा सुमारे चाळीस हजारांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला.
पहिल्या लुटमारीनंतर दुसरी घटना अवघ्या पंधरा मिनिटांनंतर त्याच ठिकाणी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला घडली. झायलो मोटारीतून काही प्रवासी पुण्याहून मुंबईकडे चालले होते. काहीतरी त्रास जाणवत असल्याचे सांगून चालकाने त्याच ठिकाणी रात्री गाडी थांबविली. काही वेळात तिथे तिघे जण आले. मोटारीतील प्रवासी आनंद अरिवद वंजारा, वैशाली वंजारा व अन्य (सर्व राहणार परमार गार्डन, केदारी पेट्रोलपंपाजवळ, वानवडी, पुणे) यांना त्यांनी ‘इथे काय करता’ असा दम भरला. त्यानंतर प्रवाशांकडील सोन्याचे दागिने, गणपतीची सुवर्णमूर्ती व रोख १८ हजार रुपये असा एकूण एक लाख लाख ३३ हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला. हे चोरटेही अंदाजे २० ते २५ वयोगटातील होते. त्यांनीही तोंडाला रुमाल बांधला होता. त्यांच्या हातात चाकू, बिअरच्या बाटल्या व दगड होते.

मोटार संशयास्पदरीत्या थांबविल्याबाबत चौकशी
पुण्याहून मुंबईकडे जात असलेल्या मोटारीमध्ये आनंद वंजारा हे प्रवासीही होते. वंजारा हे अमेरिकेतील एका बँकेत संगणक अभियंता म्हणून काम करतात. बहिणीच्या विवाहासाठी ते नुकतेच पुण्यात आले होते. अमेरिकेहून त्यांची पत्नी व मुले मुंबईत येणार असल्याने त्यांना आणण्यासाठी वंजारा हे रात्री खासगी मोटारीने मुंबईला चालले होते. त्यावेळी त्यांना लुटमारीला सामोरे जावे लागले. पंधरा मिनिटांपूर्वीच ज्या ठिकाणी लुटमार झाली, त्याच ठिकाणी वंजारा यांच्या मोटारीच्या चालकाने गाडी थांबविली. हा प्रकार संशयास्पद असल्याने पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आय. एस. पाटील हे अधिक तपास करीत आहेत.