करोनावरील लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टिटय़ूट आणि जिनोव्हा बायो फार्मासिटिक्युअल्स कंपनीला भेट देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शनिवारी (२८ नोव्हेंबर) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या स्वगताला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल अथवा मुख्यमंत्री यांनी मोदींच्या स्वगताला येऊ नये अशा सूचना पंतप्रधान कार्यालयाकडून आल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पुण्याला जाणार नाही.

राजशिष्टाचारानुसार पंतप्रधान एखाद्या राज्यात गेल्यास तेथील मुख्यमंत्री त्यांच्या स्वागतासाठी येतात. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान कार्यालयाकडून स्थानिक प्रशासनाला स्वागत समारंभ आणि भेटीगाठी टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुण्यात पंतप्रधानांच्या स्वागताला जाणार नाहीत, अशी माहिती राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे दौऱ्यातही काहीसा बदल झाला आहे. यापूर्वीच्या कार्यक्रमानुसार पंतप्रधान मोदी दुपारी एक वाजता सिरम इन्स्टिट्यूटमध्ये येणार होते. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या आजूबाजूला पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनी आणि ऑक्सफर्ड  विद्यापीठाने विकसित केलेल्या लशीचे उत्पादन पुण्याच्या सीरम इन्स्टिटय़ूटकडून घेण्यात येत आहे. चाचण्यांचे विविध टप्पे प्रगतिपथावर आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी पुण्यात येत आहेत.