पुणे : जलद, सुरक्षित प्रवासी सेवेच्या दृष्टीने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यासाठी अंदाजपत्रकामध्ये भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मेट्रो मार्गाचे जाळे, पीएमपीसाठी नव्या गाडय़ा, महत्त्वाच्या रस्त्यांसाठी स्वतंत्र तरतुदी, ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती याअंतर्गत करण्यात येणार आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत दोन मार्गिकांची कामे सुरू आहेत. पीएमआरडीएच्या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचे कामही येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. शहराच्या र्सवकष वाहतूक आराखडय़ात १९५. २६ किलोमीटर लांबीचे मेट्रोचे मार्ग प्रस्तावित आहेत. स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मार्गाला मान्यता मिळालीअसून प्रकल्प आराखडा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याशिवाय रामवाडी ते लोहगांव विमानतळ, रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गाचा आराखडा करण्यासाठी अंदाजपत्रकात आठ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.

रस्त्यावरील चौकांची संख्या, वाहतूक कोंडीची ठिकाणे, सिग्नलाचा कालावधी यांचा अभ्यास करून सिग्नल सुसूत्रीकरणाचे काम सुरु आहे. मेट्रो, बीआरटी, ठिकठिकाणी उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलिसांना मदत व्हावी, कोंडी कमी व्हावी आणि पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी वर्दळीच्या मुख्य चौकांमध्ये १०० ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकामध्ये १ कोटी २० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

पीएमपीच्या ताफ्यात पर्यावरणपूरक, विजेवर चालणाऱ्या २५ गाडय़ा पहिल्या टप्प्यात दाखल झाल्या आहेत. पाचशे गाडय़ा टप्प्याटप्प्याने आणि ८०० सीएनजीवरील गाडय़ा घेण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. महिलांच्या तेजस्विनी या सेवेसाठी २७ गाडय़ांची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे विजेवर चालणाऱ्या गाडय़ांसाठी १०५ कोटी, तर सीएनजीवरील ८०० गाडय़ांसाठी ७५ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.

रस्त्यावरील वाहतूक ताण कमी होणार

* कात्रज-कोंढवा बाह्य़वळण रस्त्याचे काम सुरू असून ८४ मीटर रुंद रस्त्याची आखणी नव्याने करण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात ५५ कोटी तरतूद करण्यात आली आहे.

* नदीपात्रातील शिवणे-खराडी असा १८ किलोमीटर लांबीचा रस्ता निश्चित करण्यात आला आहे. शिवणे-म्हात्रे पूल, म्हात्रे पूल-संगमवाडी आणि संगमवाडी-खराडी अशा तीन टप्प्यात हे काम होणार आहे. त्यासाठी २२ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे.

* कर्वे रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बालभारती-पौड फाटा रस्त्याच्या निर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी २८ लाखांची तरतूद.