News Flash

पंचावन्न रुपयांची कंपासपेटी खरेदी केली शहात्तर रुपयांना

सहल घोटाळ्यापाठोपाठ महापालिका शिक्षण मंडळातील कंपास खरेदी घोटाळा बाहेर आला असून ५५ रुपये किमतीची कंपासपेटी मंडळाने तब्बल ७६ रुपयांना खरेदी केली आहे.

| May 31, 2013 02:55 am

सहल घोटाळ्यापाठोपाठ महापालिका शिक्षण मंडळातील कंपास खरेदी घोटाळा बाहेर आला असून ५५ रुपये किमतीची कंपासपेटी मंडळाने तब्बल ७६ रुपयांना खरेदी केली आहे. बाजारभावापेक्षा २५ टक्के जादा दराने झालेल्या या खरेदीची दक्षता विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
शिक्षण मंडळाने केलेल्या या खरेदीबाबतची माहिती सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर, जुगल राठी आणि विश्वास सहस्रबुद्धे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. शैक्षणिक वर्ष संपता संपता शिक्षण मंडळाने कोरस अ‍ॅक्युरा या कंपासपेटय़ा खरेदी केल्या. मंडळाने मार्च महिन्यात ही खरेदी केली असून ३२ हजार कंपासपेटय़ांची ही खरेदी प्रत्येकी ७५ रुपये ९० पैसे या दराने करण्यात आली आहे. कंपास पुरवण्यासाठी ज्या तीन निविदा पात्र ठरल्या होत्या, त्यातील हा सर्वात कमी दर होता. त्यानुसार मंडळाने ही खरेदी केली असली, तरी या खरेदीत मंडळाने साडेसहा लाख रुपये जादा दिले आहेत, अशी तक्रार सजग नागरिक मंचने केली आहे.
या खरेदीची माहिती मिळाल्यानंतर बाजारातून आम्ही काही स्टेशनरी पुरवठादारांकडून निविदा मागवल्या, तसेच प्रत्यक्ष दुकानांमध्ये जाऊनही कोरस अ‍ॅक्युरा या कंपासपेटय़ांचे दर तपासले. ज्या कंपासची खरेदी मंडळाने केली आहे तशा पाच हजार कंपासपेटय़ा पुरवण्यासाठी प्रतिनग ५८ रुपये ५० पैसे असा दर आम्हाला पुरवठादारांनी लेखी पत्राने कळवला. मंडळाने तर ३२ हजार कंपासपेटय़ा खरेदी केलेल्या असल्यामुळे मंडळाला कंपासपेटी ५५ रुपये प्रतिनग या दराने सहज मिळाली असती, असे वेलणकर यांनी सांगितले.
हजारो कंपासपेटय़ा खरेदी करताना मंडळाच्या सदस्यांनी बाजारभावाची चौकशी का केली नाही आणि जादा दराने आलेल्या निविदा सदस्यांनी व प्रशासनाने का मंजूर केल्या, असाही प्रश्न सजग नागरिक मंचने उपस्थित केला आहे. शिक्षण मंडळाचे सदस्य आणि अधिकारी यांचा खरेदीशास्त्राचा अभ्यास नसल्याने अशाप्रकारे जनतेचा पैसा वाया जात आहे. त्यामुळे मंडळाकडे असलेले खरेदीचे सर्व अधिकार काढून घ्यावेत, अशीही मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2013 2:55 am

Web Title: pmc education boards new fraud in compass box tender
टॅग : Fraud,Pmc
Next Stories
1 नयना पुजारी खून खटला: अखेर योगेश राऊत पोलिसांच्या तावडीत
2 सलाइनच्या बाटलीत बुरशी!
3 कोण होतं बारावीला? अरे, मीच होतो बारावीला..
Just Now!
X