महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका क्रीडा क्षेत्रात विशेष चमक दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला असून रिक्षाचालकांचे पैसे थकल्यामुळे शिक्षण मंडळाचे दत्तवाडीतील क्रीडानिकेतन बंद पडले आहे. या रिक्षाचालकांचे सात महिन्यांचे पैसे महापालिकेने थकवले असून ते देण्याबाबत कोणीही जबाबदारी घेण्यास तयार नसल्यामुळे रिक्षावाहतूक बंद झाली आहे.
महापालिका शिक्षण मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विद्यानिकेतन शाळांचा प्रकल्प चालवला जातो. या शाळांमधील हुशार विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती सातत्याने उत्तम राहिली आहे. गुणी विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेला विद्यानिकेतनचा प्रकल्प यशस्वी ठरल्यामुळे शिक्षण मंडळाने काही वर्षांपूर्वी क्रीडानिकेतनचा प्रकल्प सुरू केला. शहरात शिक्षण मंडळाची तीन क्रीडानिकेतन असून महापालिका शाळांमधील जे विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतील, अशा विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना क्रीडानिकेतन शाळांमध्ये प्रवेश दिला जातो.
शहराच्या सर्व भागात राहणारे विद्यार्थी या शाळांमध्ये शिकतात. त्यामुळे त्यांचे घर व शाळा यात मोठे अंतर आहे. त्यावर उपाय म्हणून या विद्यार्थ्यांना नेण्या-आणण्याची सोयही महापालिका शिक्षण मंडळाकडून केली जाते. अन्य शाळांमधील विद्यार्थी ज्या पद्धतीने रिक्षामधून शाळेत जातात व येतात, त्याच पद्धतीने या विद्यार्थ्यांसाठी रिक्षा ठरवण्यात आल्या आहेत. दत्तवाडीतील शाळेत सध्या २४० विद्यार्थी शिकत असून या विद्यार्थ्यांसाठी १७ रिक्षाचालक नेमण्यात आले आहेत. या रिक्षाचालकांची महिनाभरात जेवढी वाहतूक होते त्या प्रमाणात निश्चित केलेल्या दरानुसार त्यांना किलोमीटर प्रमाणे पैसे दिले जात असत.
महापालिका शिक्षण मंडळाचा कारभार कोणी पाहायचा याबाबत सध्या अनिश्चितता असल्यामुळे तूर्त महापालिका प्रशासनाकडे मंडळाचा कारभार आहे. मात्र, सध्याच्या शिक्षण मंडळाची मुदत संपेपर्यंत सदस्य कारभार करू शकतात, असे सदस्यांचे म्हणणे आहे. हा वाद सुरू असल्यामुळे सध्या मंडळाचा कारभार विस्कळीत झाला आहे. त्याचाच फटका रिक्षाचालकांना आणि क्रीडानिकेतनमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बसला आहे. दत्तवाडीत असलेल्या क्रीडानिकेतनमधील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांचे गेल्या सात महिन्यांचे पैसे थकल्यामुळे अखेर त्यांनी आता रिक्षा आणणे बंद केले आहे. त्यामुळे गेले तीन दिवस ही शाळा बंद आहे.

शिक्षण मंडळाच्या क्रीडानिकेतनमधील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांचे पैसे अनेक महिने थकले आहेत आणि त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही हे पैसे दिले जात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. रिक्षाचालकांना पैसे देण्याबाबत महापालिकेकडे कित्येक वेळा पाठपुरावा केला आहे. मात्र संबंधित अधिकारी त्याबाबत कोणताही निर्णय घेत नाहीत.
प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ
अध्यक्ष, महापालिका शिक्षण मंडळ