बाळासाहेब जवळकर balasaheb.javalkar@expressindia.com

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात बरीच अस्वस्थता आहे. गुन्हेगारी कारवायांनी पुन्हा उचल खाल्ली असल्याचे चित्र समोर आले आहे. अपुरी पोलीस यंत्रणा, वाहनांची कमतरता, पोलीस दलातील राजकारण आणि अर्थकारण अशा गोष्टींमुळे पोलीस दलात सगळे काही आलबेल नाही, असे दिसून येते.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दहा दिवसांच्या अंतरात तोडफोडीच्या चार घटना घडल्या आहेत. पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसाला मारहाण करण्याचा प्रकार चाकणला घडला. चोऱ्या, हाणामाऱ्या, खून, टोळक्यांचा उच्छाद, अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारी कारवाया अशा गुन्ह्य़ांमध्ये काहीही फरक पडलेला नाही. पोलीस यंत्रणा निवडणुकांच्या कामात अडकली आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे फावले आहे.

पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन हे विविध घोषणा करतात. त्या दृष्टीने पुढील अंमलबजावणी होत नाही. विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनस्वारांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. मात्र, नव्याचे नऊ दिवस सरले आणि कारवाई थंडावली. आता पोलिसांच्या डोळ्यासमोरून सर्रास नियम मोडत वाहनस्वार जातात. महापालिका कुचकामी ठरल्याने रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्याच्या पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईमध्येही खंड पडला आहे. तोच प्रकार ‘फोन अ फ्रेंड’ योजनेचा. मोठा गाजावाजा करून ही योजना सुरू करण्यात आली. आजमितीला त्याचे काय झाले, सांगता येणार नाही. गरजवंतांचा मदतीसाठी पोलिसांना दूरध्वनी आला. मात्र, पोलीस वेळेवर पोहोचले नाहीत, म्हणून अनेकांवर कारवाई करण्याची वेळ पोलीस आयुक्तांवर आली. पोलीस आयुक्तालयाला असलेली अपुरी कर्मचारी संख्या आणि

वाहनांच्या कमतरतेची समस्या तशीच राहिली आहे. पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबतचे गाऱ्हाणे मांडल्यानंतर ही समस्या दूर करण्याचे आश्वासन त्यांना मिळाले. मात्र, त्या दृष्टीने अपेक्षित कार्यवाही न झाल्याने अद्यापही जैसे थे परिस्थिती आहे.

आता लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला आहे. मावळ आणि शिरूर लोकसभेचे बरेचसे क्षेत्र पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने पोलीस यंत्रणेवर बराच ताण पडणार आहे. अशा परिस्थितीत, पिंपरी पोलीस दलात सर्वकाही आलबेल नाही. साधनसुविधांच्या कमतरतेमुळे पोलीस हैराण आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी राजकारण पेटले आहे. बदल्यांसारख्या काही विषयांमध्ये अर्थकारणाचे सावट आहे. पोलीस आयुक्त निवृत्तीच्या वाटेवर असून आयुक्तालयाची समांतर यंत्रणा कार्यरत आहे. सहायक पोलीस आयुक्त होऊ घातलेल्या एका अधिकाऱ्याने सर्व काही ताब्यात घेतले आहे.

पोलीस आयुक्तांची संमती आहे की परस्पर कारभार सुरू आहे, या विषयी अनेक तर्कवितर्क आहेत.

रात्रीस खेळ चाले

वाढदिवसाचे केक तलवारीने कापल्यास थेट तुरुंगाची हवा खावी लागेल, असा सज्जड दम पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिला. त्याचा परिणाम काही दिवस जाणवला. मात्र, पुन्हा एकदा या प्रकाराने डोके वर काढले आहे. मध्यंतरी सूस येथे एका नेत्याने असाच उद्योग केल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. तसाच प्रकार या आठवडय़ात वाकडला घडला. एका माजी नगरसेवकाने गोंधळ घालत तलवारीने केक कापल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अजूनही गुपचूप पद्धतीने हे प्रकार सुरूच आहेत. पोलिसांपर्यंत त्याची माहिती पोहचत नाही, त्यामुळे ती प्रकरणे कागदावर येत नाहीत. केवळ तलवारीने केप कापण्याचा प्रकार नाही. तर, रात्रीस बरेच खेळ चालतात. सोसायटय़ांच्या आवारात गोंधळ घालणारी उनाड मुले, भरधाव धावणाऱ्या दुचाकींवर आरडाओरडा करणारी तरुण मुले, गाडय़ांचे सायलेन्सर काढून चित्रविचित्र आवाज काढत दुसऱ्यांना घाबरवणारे वाहनस्वार, काहीही कारण काढून होणारी फटाक्यांची आतषबाजी, उघडपणे तलवारी आणि कोयते घेऊन फिरणारे गुन्हेगार, रात्री दहाचा नियम बासनात गुंडाळून उशिरापर्यंत चालणाऱ्या वराती आणि मिरवणुका अशी कितीतरी उदाहरणे देता येतील, ज्यामुळे नागरिकांना हमखास त्रास होतो. मात्र, त्यावर  पोलिसांकडून अपेक्षित कारवाई केली जात नसल्याने हे प्रकार वाढतच आहेत.

पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत

पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत होण्याचा प्रकार गेल्या आठवडय़ात घडला. पवना धरणाच्या विद्युत निर्मिती संचामध्ये बिघाड झाल्यामुळे नदीत पाणी सोडण्याच्या दैनंदिन प्रक्रियेत व्यत्यय आला. रावेत बंधाऱ्यातील पाण्याची पातळी तसेच धरणातून बंधाऱ्यात येणारे पाणी कमी झाल्याचे कारण याही वेळी देण्यात आले. शहराच्या दृष्टीने पुरेसे पाणी उपलब्ध असूनही योग्य नियोजनाअभावी शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते, हे पुन्हा अधोरेखित झाले. या विभागात अनिच्छेने येणारे कामचुकार अधिकारी हे देखील तितकेच महत्त्वाचे कारण आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानुसार, पाण्याचा वापर आणि पर्यायाने पाण्याची गरज वाढत आहे. मात्र, पाणीपुरठय़ाचे वितरण व्यवस्थित होत नसल्याचा त्रास सर्वानाच होतो आहे. पाण्याचा उपलब्ध साठा कमी होत असताना पाणीकपात लागू करणे आवश्यक होते. मात्र, नागरिकांची नाराजी ओढावी लागू नये म्हणून तो निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. मात्र, उशिरा का होईना पाणीकपात लागू करावीच लागली. पाणीपुरवठा यंत्रणेतील दुरुस्तीच्या नावाखाली शहराचा पाणीपुरवठा अनेकदा बंद ठेवण्यात येतो. कधी तो विस्कळीत होतो. अनेकदा कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात येत असल्याची शंका व्यक्त केली जाते. त्यामुळे यामागचे खरे कारण शोधून काढले पाहिजे.