कृष्णा पांचाळ |  देशभरासह राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सरकारने लॉकडाउनची घोषणा केलेली आहे. तर सरकारच्या आदेशाची नागरिकांनी अंमलबजावणी करावी व घरातच थांबावे यासाठी रात्रंदिवस कर्तव्यावर असलेल्या पोलीस प्रशासनाची धडपड अवघा देश पाहतो आहे. अशा कर्तव्यदक्ष पोलिसांनाही वेळेवर खायला मिळावं यासाठी एका पोलीस पत्नीने पुढाकर घेत पोलिसांना मोफत चहा, नाश्ताचे वाटप सुरू केले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावत असताना कुटुंबाला स्वतः पासून दूर ठेवलं आहे. काहींनी तर पत्नी, मुलाला गावी पाठवलं आहे. त्यात लॉकडाउन असल्याने अनेकांना सकाळचा नीट नाश्ता मिळत नाही. ही परिस्थिती लक्षात घेत कविता नितीन नम यांनी पुढाकार घेऊन सोसायटीमधील एकाच्या मदतीने कर्तव्यावरील पोलिसांना दररोज सकाळी चहा, नाश्ता व सायंकाळी पुन्हा चहा मोफत देण्याचं काम हाती घेतलं आहे.

कविता यांचे पती नितीन हे हवेली पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांना दररोज जेवणाचा डबा देतात. परंतु, तिथे गेल्यानंतर मात्र त्यांना चहा किंवा नाश्ता मिळत नसल्याचे त्यांनी पत्नीला सांगितलं. त्यावरून पिंपरी-चिंचवड पोलीस विभागातील अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचं देखील असंच होत असेल ना? असा प्रश्न कविता यांनी उपस्थित केला आणि त्यांना आपण सकाळचा चहा नाश्ता दिला तर असं नितीन यांना विचारलं असता त्यांनी होकार दिला. पती नितीन यांनी पाठबळ दिल्यानंतर कविता नम ह्या आता सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना मोफत चहा आणि नाश्ता पुरवत आहेत.

सकाळी सहा वाजता कविता यांचा दिनक्रम सुरू होतो. जवळपास शंभर जणांचा चहा नाश्ता त्या बनवता. त्यानंतर किशोर काकांच्या मदतीने नाकाबंदीवर आणि पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देतात. एवढ्या आपुलकीने दिलेला नाश्ता हा घरच्या चवी पेक्षा कमी नसल्याची प्रतिक्रिया येथील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्याच्या परिस्थिला पोलीस हे देवदूता पेक्षा कमी नाहीत पण त्यांच्या ही काही गरजा असून त्या पुरवणे महत्वाचे आहे. पोलीस पत्नी कविता यांनी त्या ओळखून पोलिसांना नाश्ता दिल्याने त्यांना समाधान मिळत असल्याच त्या म्हणाल्या.