16 November 2019

News Flash

पाऊस आला, वीज गेली!

महावितरणच्या कुचकामी यंत्रणेचे पितळ उघड

(संग्रहित छायाचित्र)

महावितरणच्या कुचकामी यंत्रणेचे पितळ उघड

थोडासा वारा आणि पावसाचा हलकासा शिडकावा झाला तरी शहरातील बत्ती गुल होत असल्याचा अनुभव यंदाही पहिल्याच पावसात पुणेकरांनी घेतला. त्यामुळे ‘पाऊस आला, वीज गेली’ हे कित्येक वर्षांपासूनचे सूत्र महावितरण कंपनीने यंदाही राखले आहे. सर्वाधिक वीजबिलांचा भरणा आणि सर्वात कमी विजेची हानी असल्याने वीजसेवेच्या सर्वोच्च गटात मोडणाऱ्या पुणे शहरातील कुचकामी वीज यंत्रणेचे पितळ पुन्हा उघड झाले आहे. दर गुरुवारी वीज बंद ठेवून आणि पावसाळापूर्व दोन महिने देखभाल- दुरुस्तीच्या नावे सुरळीत वीजपुरवठय़ाचे ढोल बडविणाऱ्या महावितरणने नेमकी कोणती कामे केली, असा प्रश्न आता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

शहरामध्ये रविवारी (९ जून) पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. संध्याकाळी सहाच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांतच शहराच्या मध्यवस्तीसह विविध भागातील वीज गायब झाली. काही भागात ती एक ते दोन तासांत पूर्ववत झाली तरी, अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत वीज गायब होती. बहुतांश भागात रात्रभर विजेचा लपंडाव सुरू होता. याबाबत वीज ग्राहकांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. महावितरणकडून प्रत्येक गुरुवार यंत्रणेच्या देखभाल- दुरुस्तीसाठी राखीव ठेवला जातो. शहराच्या विविध भागात गुरुवारी आठ तासांपर्यंत वीज बंद ठेवून यंत्रणांची देखभाल- दुरुस्ती केली जात असल्याचे सांगितले जाते. पावसाळ्यात विजेची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी दरवर्षी जूनपूर्वी दोन महिन्यांपासून मान्सूनपूर्व देखभाल- दुरुस्ती केली जात असल्याचा दावाही केला जातो. यंदाही मान्सूनपूर्व कामे करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. मात्र, पहिल्याच पावसातील स्थिती पाहता कामांचा दावा फोल असल्याचे उघड झाले आहे.

वीजबिलांची सर्वाधिक वसुली आणि राज्यात सर्वात कमी वीजगळती यामुळे पुणे शहर महावितरणच्या सर्वोच्च ए-वन या गटात आहे. सर्वाधिक महसूल देणाऱ्या शहरातील वीजयंत्रणा सर्वात सक्षम असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने विविध योजनांच्या माध्यमातून कोटय़वधीची वीजकामे मागील काही वर्षांत शहरात करण्यात आली. बहुतांश वीजवाहिन्या भूमिगत करण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही वीजग्राहकांना जाच सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील महावितरणची बहुतांश यंत्रणा कुचकामी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महावितरणचा दावा फोल कसा?

पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या लहान फांद्या तोडणे, तुटलेली छोटी उपकरणे बदलणे, वितरण रोहित्रांचे अर्थिग तपासणे, उपकेंद्रांमधील ब्रेकरची दुरुस्ती, बॅटरी चार्जिग, फ्यूज बदलणे, भूमिगत वीजवाहिन्या टाकणे, वीज खांब आणि तारांचे मजबुतीकरण, आवश्यकता असल्यास खांब, तारा बदलणे, जुन्या फिडर पिलरची देखभाल करणे, पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरातील फिडर पिलरची (वीज पेटय़ा) जमिनीपासूनची उंची वाढविणे आदी कामे झाली. उन्हात तापलेल्या अवस्थेत असलेल्या वीज यंत्रणेतील डिस्क आणि पीनवर पावसाचे थेंब पडल्यास त्यांना भेगा पडून वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे हजार डिस्क आणि पीन बदलण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले होते. मात्र, यातीलच बहुतांश कारणांनी वीज गायब झाल्याने महावितरणचा दावा फोल ठरला.

पहिल्याच पावसात यंत्रणेच्या देखभाल- दुरुस्तीचे पितळ उघडे पडले. इन्फ्रा १ आणि २ मध्ये शेकडो कोटी रुपये विजेच्या पायाभूत यंत्रणेसाठी खर्च झाले. शेकडो किलोमीटर वीजवाहिन्या जमिनीखाली गाडल्या. वर्षभर देखभाल- दुरुस्तीच्या नावाखाली दर गुरुवारी वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. असे असतानाही केवळ अध्र्या तासाच्या पावसात पुण्यासारख्या स्मार्ट सिटीत अनेक ठिकाणी वीजपुरवठा बंद पडत असेल, तर महावितरणला झटका देण्याची गरज आहे.    – विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच अध्यक्ष

First Published on June 11, 2019 12:46 am

Web Title: power supply broken 2