उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षांनी योगी सरकारला धारेवर धरले असून, मोठ्या प्रमाणावर टीका देखील केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपावर देखील निशाणा साधला आहे. महिला म्हणजे उपभोग्य वस्तू असा संघ आणि भाजपाचा दृष्टीकोन असल्याचं प्रकाश आंबेडकर पुण्यात म्हणाले आहेत.

“उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे. सर्व स्तरातून हा निषेध नोंदवला गेला ही चांगली गोष्टं असं मी मानतो. तरूण पिढी आता महिलांवरील अत्याचारांकडे एका वेगळ्या नजरेतून पाहताना दिसत आहे. आरएसएस-भाजपा हे महिला उपोभगण्याची वस्तू आहेत, असा प्रचार आणि प्रसार करतात. ती महिला आहे, तिला जगण्याचा अधिकार आहे आणि तिचे अधिकार शाबूत राहिले पाहिजेत. तिला जसं जगायचं आहे, तसं तिला जगता आलं पाहिजे. तिच्यावर कुणी अत्याचार करू नये, अशा पद्धतीने असलेली माणसिकता नव्या पिढीकडे आहे. ही नवी पिढी मला देशभरात रस्त्यावर उतरलेली दिसत आहे.” असं यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी बोलून दाखवलं.

तसेच, “पीडित कुटुंबाकडून जे काही आरोप केले जात आहेत. पोलीस किंवा एसआयटी त्यांना सूचना असल्याशिवाय स्वतःहून कधीही धमकावू शकत नाही. त्यांना या सूचना कोण देणार? तर राजकीय नेतृत्वच त्यांना या सूचना देणार. म्हणूनच त्या कुटुंबाने जी मागणी केली आहे की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्यावतीने एका न्यायाधीशाची नेमणूक केली जावी आणि त्यांच्याच नियंत्रणाखाली ही चौकशी झाली तर आम्हाला न्याय मिळेल. या मागणीला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देत आहोत.” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

मोदी मौनी बाबा –
मोदींनी मुरादबादमधील दंगलीबाबतही काही बोलले नाही, हा मौनी बाबा आहे. मी तरुणांना एवढंच सांगेन की, जो काही प्रचार आणि अपप्रचार सुरू आहे त्याला बळी पडू नये. तरुण पिढीने हे लक्षात घेतलं पाहिजे का आता अत्याचार कुणी सहन करणार नाही. कायद्याचं राज्य चाललं पाहिजे. सध्या कायद्याची आहे ती व्यवस्था तरूण पिढीने टिकवली पाहिजे. असं देखील यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी तरूणांना आवाहन केलं.