पिंपरी चिंचवडमध्ये एक असा अवलिया आहे जो हातात आठ कात्र्या घेऊन हेअर कट करतो. प्रशांत खरे असे या सलून चालकाचे नाव आहे. प्रशांत यांची ही स्टाईल पाहून अनेक महिला त्यांच्या सलूनमध्ये हेअर कट करण्यासाठी येतात. येत्या काळात १२ कात्र्यांनी हेअर कट करुन गिनीज बुकात नाव नोंदवायचं असंही खरे यांनी सांगितलं. काही महिन्यांपूर्वी सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी केल्याची बातमी चांगलीच चर्चेत होती. त्यानंतर अनेकांनी त्यांचं अनुकरणही केलं. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये प्रशांत खरे हे त्यांच्या आठ कात्र्यांनी हेअर कट करण्याच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. खास करुन महिलांमध्ये प्रशांत खरे यांच्या या आठ कात्र्यांच्या स्टाईलची विशेष क्रेझ आहे. प्रशांत’स् सलून या नावानेच त्यांनी पिंपरीत सलून सुरु केलं आहे. त्यांच्या या अनोख्या स्टाईलमुळे या ठिकाणी ग्राहकांची गर्दी होते.

प्रशांत खरे हे जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्यांनी हेअर कट करण्याचं प्रशिक्षण घेतलं. प्रशांत हे जेव्हा पार्लरसाठीचा कोर्स करत होते तेव्हा तिथे अनेक जण दोन कात्र्या हाती घेऊन हेअर कट करत असल्याचे त्यांनी पाहिले. आपण काहीतरी वेगळं करायचं असं प्रशांत यांनी तेव्हाच ठरवलं होतं. त्यातूनच आठ कात्र्यांनी हेअर कट करण्याची भन्नाट कल्पना त्यांना सुचली. त्यांच्या सलूनमध्ये महिला आठ कात्र्यांनी हेअर कट करण्यासाठी गर्दी करतात. प्रशांत खरे काहीतरी वेगळं करत असल्यानेच ग्राहकांचे पाय त्यांच्या पार्लरकडे वळतात.

पाहा व्हिडिओ

दरम्यान प्रशांत खरे यांच्या वडिलांशीही लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधींनी चर्चा केली. प्रशांत खरे यांचे वडील भरत बाळू खरे म्हणाले की, ” माझा मुलगा प्रशांत करत असलेले काम कौतुकास्पद आहे. आमच्या वेळी पोत्यावर बसून ग्राहक केस कापून घ्यायचे. आता काळ बदलला आहे. वेगळ्या पद्धती समोर येत आहेत.  प्रशांतने स्वतःची अशी स्टाईल शोधली.  खरं तर आठ कात्र्यांनी हेअर कट करणं कठीण आहे. मात्र त्याने ते साध्य केलं. ” हेअर कटबाबत प्रशिक्षण देण्याचं स्कूल उघडावं असा प्रशांत खरे यांचा मानस आहे. तसंच भविष्यात १२ कात्र्यांनी हेअर कट करुन गिनीज बुकात नोंद करण्याची इच्छा आहे असं प्रशांत खरे यांनी लोकसत्ता ऑनलाईनला सांगितलं.