News Flash

तीळगुळाची गोडी महागली! – हलव्याच्या दागिन्यांमध्ये कान्हा मुरारी सेट अन् जावयाचे वाण

तीळ आणि गुळाच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे तीळगुळाची गोडी महागली असली, तरी हलव्याचे दागिने मात्र गेल्या वर्षीच्याच दरामध्ये मिळणार आहेत.

परस्परांमधील प्रेम आणि स्नेहभाव जपण्याचे माध्यम असलेल्या मकरसंक्रांतीसाठी हलव्याच्या दागिन्यांमध्ये बालकांसाठीच्या कान्हा मुरारी सेट आणि जावयाचे वाण याला विशेष मागणी आहे. तीळ आणि गुळाच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे तीळगुळाची गोडी महागली असली, तरी हलव्याचे दागिने मात्र गेल्या वर्षीच्याच दरामध्ये मिळणार आहेत.
मकरसंक्रांतीचा सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असल्याने बाजीराव रस्त्यावरील खाऊवाले पाटणकर, चितळे बंधू मिठाईवाले आणि काका हलवाई या दुकानांमध्ये तीळगुळाच्या वडय़ा आणि लाडू खरेदीसाठी गर्दी होत आहे. मात्र, हलव्याच्या दागिन्यांसाठी खाऊवाले पाटणकर यांनाच पसंती दिली जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत तिळाच्या दरामध्ये जवळपास दुप्पट, तर गुळाच्या दरामध्येदेखील मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मागील वर्षी २५० रुपये किलो असलेल्या तीळगुळाच्या वडय़ा यंदा ३०० रुपयांना आहेत. तिळाचे लाडू मऊ आणि कडक अशा दोन्ही प्रकारांमध्ये आहेत. तीळगूळ महागला असला तरी हलव्याच्या दागिन्यांच्या दरामध्ये मात्र कोणतीही वाढ झालेली नाही, अशी माहिती सोनिया पाटणकर यांनी दिली.
हलव्याच्या दागिन्यांमध्ये लहान बाळांसाठी यंदा कान्हा मुरारी सेट करण्यात आला आहे. यामध्ये मुगुट, हार, हातातील गजरे, बाजूबंद, बासरी, करदोटा आणि पायातील वाळी या हलव्याच्या अलंकारांचा समावेश असून ८५० रुपये ते १२५० रुपये असे त्याचे दर आहेत. जे दागिने सोन्यामध्ये घडविले जातात तेच महिलांचे अलंकार हलव्यामध्येही केले जातात. कपाळावरची िबदी ते पायांतील पैंजण असे विविध अलंकार उपलब्ध असून किमान १०० रुपये ते १७५ रुपये असे वेगवेगळय़ा अलंकारांचे दर आहेत. तर, पुरुषांसाठी हार, हातातील गजरे, नारळ, ब्रेसलेट, अंगठी, घडय़ाळ असे विविध अलंकार आहेत. पुणेरी पगडी, गळय़ातील कंठा, भिकबाळी, उपरणे असा पेशवाई सेट १२०० रुपयांना आहे. तर, कापडी हत्ती, पाच प्रकारचा हलवा असा जावयाचा वाण या सेटलादेखील चांगली मागणी आहे.

जिव्हाळा तीळगूळ डबा
परदेशातील मराठी बांधवांना तीळगुळाची गोडी चाखता यावी यासाठी ‘जिव्हाळा तीळगूळ डबा’ ही संकल्पना प्रथमच राबविण्यात आली आहे. यामध्ये गुळाची पोळी, तीळगुळाच्या वडय़ा, राजस्थानी तीळपापडी, इंदोरी गजक, पंजाबी ड्रायफ्रूट पंजिरी, रेवडी आणि हलवा या पदार्थाचा अंतर्भाव असून अडीच किलोचा हा डबा ३,४९९ रुपयांमध्ये अमेरिकेला पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे सोनिया पाटणकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2014 3:15 am

Web Title: price hike for sweets for makarsankrant
टॅग : Makar Sankranti
Next Stories
1 एकांकिकेची ‘नाटय़संपदा’
2 देशाच्या विकासाचा मान्सून हाच महत्त्वाचा घटक – सुनीता नारायण
3 पालिकेने टीडीआरची प्रक्रिया पिंपरीप्रमाणे सुलभ, जलद करावी
Just Now!
X