करोना विषाणूमुळे जगभरात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिका, ब्रिटन या देशानी त्यांच्या बेरोजगार आणि पगारात कपात झालेल्या कर्मचाऱ्याच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. आता त्याच धर्तीवर आपल्या देशाच्या तिजोरीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बेरोजगारांच्या खात्यात काही रक्कम जमा करावी. केंद्र सरकारने अशा स्वरूपाची पावले लवकर न उचल्यास, देशात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे झाल्यास त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार असतील, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केले.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आपल्या देशाचा आर्थिक विकासाचा दर करोना विषाणू येण्यापूर्वी कमी होता आणि आता त्यानंतर आणखी खाली गेला आहे. तरी देखील केंद्र सरकार देशाची आर्थिक परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे. या परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

तसेच ते पुढे म्हणाले की, करोना विषाणूमुळे जगभरातील बाजार पेठ ठप्प झाली असून, प्रत्येक देश कित्येक वर्षे मागे गेले आहेत. अशीच परिस्थिती आपल्या देशाची भविष्यात होणार आहे, असे अनेक अर्थ तज्ञ सांगत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, विकासदर पूर्वीसारखाच राहील. त्यामुळे आपण कोणत्या आधारे सांगत आहात, त्या बद्दल आपण जनतेला सांगावे, असे देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.