माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मत

मराठी पुस्तकांचा प्रचार, प्रसार आणि विक्रीबाबतच्या समस्या मांडताना प्रकाशकांची एकी आवश्यक आहे, असे मत व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकाशकांमधील दोन गटांबाबत सूचक भाष्य केले. विखुरलेल्या स्वरूपात प्रश्न मांडले गेले तर त्यावर निर्णय होण्याची शक्यता कमी असते, असेही ते म्हणाले.

पुस्तक खरेदीनिमित्त चव्हाण यांनी अक्षरधारा बुक गॅलरीला भेट दिली. द्वैभाषिक पुस्तकांच्या खरेदीवरून सध्या जो गोंधळ आणि वाद सुरू आहे त्याबाबत चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे, कार्यवाह रमेश राठिवडेकर, परचुरे प्रकाशनचे अप्पा परचुरे, डॉ. सतीश देसाई आणि अक्षरधाराच्या संचालिका रसिका राठिवडेकर या वेळी उपस्थित होत्या.

चव्हाण म्हणाले, ‘‘कर्नाटकमध्ये नव्याने प्रकाशित आवृत्तीमधील तीनशे-चारशे पुस्तके शासन खरेदी करते. त्यामुळे प्रकाशकाचा उत्पादन खर्च हा काही प्रमाणात भरून निघतो. हा उपक्रम स्तुत्य असून काही राज्यांमध्ये निरनिराळ्या प्रकारे शासन लेखक, प्रकाशक आणि विक्रेत्यांना अनुदान देते. मी मुख्यमंत्री असताना पुस्तकांवरील स्थानिक संस्था कर (एलबीटी) माफ केला होता. ग्रंथव्यवहाराला अशाने चालना मिळते. अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना पाच वर्षे अभ्यासाखेरीज दुसरी पुस्तके वाचण्याची संधी मिळाली नाही. अर्थात त्या काळी आजच्याइतकी सहज पुस्तकेही उपलब्ध होत नव्हती. बहुतेक वेळा रेल्वे प्रवासात मी पुस्तकं वाचतो. आवडलेली पुस्तके भेट देण्याची माझी आवड आहे.’’