रुग्णांना सोडताना धनादेश स्वीकारण्यास खासगी रुग्णालये तयार
खासगी रुग्णालयात दाखल होण्याच्या वेळेबरोबरच रुग्णाला सोडतानाही धनादेश स्वीकारण्याची तयारी खासगी रुग्णालये दाखवत आहेत. नोटाबंदीनंतर परिस्थिती पूर्ववत होण्यास वेळ लागत असल्याचे चित्र असून अद्यापही नागरिकांना नवीन नोटांची तरतूद करणे अत्यंत कठीण जात आहे. या पाश्र्वभूमीवर रुग्णालयातून सोडताना रुग्णांना धनादेशाद्वारे पैसे भरण्याची सुविधा प्राप्त झाल्यास काहीसा दिलासा मिळू शकणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी एक आदेश काढून सर्व खासगी रुग्णालयांनी तातडीच्या वेळी रुग्णांकडून बिलापोटी धनादेश स्वीकारावा, असे आदेश दिले आहेत. नव्या चलनात पैसे नाहीत म्हणून रुग्णांची अडवणूक करण्याचा प्रयत्न झाल्यास रुग्णांना १०८ या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
रुग्णाला दाखल करून घेताना त्याच्याकडून धनादेश घेण्याचा पर्याय शहरातील काही रुग्णालयांनी सुरू केला होता, परंतु रुग्णालयातून ‘डिसचार्ज’ देताना धनादेशाची सोय उपलब्ध करून देण्यास नाराजी दर्शवली जात होती. ‘धनादेश वटला नाही तर काय,’ अशी भीती बोलून दाखवली जात होती. आता मात्र ‘डिसचार्ज’च्या वेळीही धनादेश घेण्यास तयार असल्याचे काही मोठय़ा रुग्णालयांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
दीनानाथ रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर म्हणाले, ‘‘आम्ही रुग्णास ‘डिसचार्ज’ देतानाही धनादेशाद्वारे बिल भरू देत आहोत. नवीन येणाऱ्या रुग्णांना दाखल करून घेताना धनादेश घेण्याचा पर्यायही ठेवला आहे.’’ रुबी हॉल रुग्णालयाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बोमी भोट आणि जहाँगीर रुग्णालयाच्या बिलिंग विभागाचे सरव्यवस्थापक गोपाळ फडके यांनीही ‘अॅडमिट’ व ‘डिसचार्ज’ या दोन्ही वेळेस धनादेश भरण्याची सुविधा असल्याचे सांगितले. फडके म्हणाले, ‘‘धनादेश वटला नाही असे सहसा होत नाही. क्वचित कधी एखादा धनादेश न वटल्यास रुग्णालय त्याची तयारी ठेवते. परंतु रुग्ण पैशांच्या स्वरूपात बिल भरण्याची तयारी दर्शवत आहेत.’’ काही रुग्णालये धनादेशाबरोबर रुग्णांकडून हमीपत्र लिहून घेत आहेत. तसे लिहून घेऊन धनादेश स्वीकारत असल्याचे ‘सह्य़ाद्री’ रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.