लसीकरणाची संपूर्ण व्यवस्था करण्याचीही तयारी

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : करोना काळात प्रशासनाला मदतीचा हात देण्यासाठी पुण्यातील विविध घटकांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या ‘पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोव्हिड रिस्पॉन्स’ (पीपीसीआर) या स्वयंसेवी समूहाने पुणे शहरासाठी दहा लाख लशींच्या मात्रा मिळण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहे. रुग्णालयांच्या माध्यमातून लसीकरणाची संपूर्ण व्यवस्था करण्याचीही तयारी पीपीसीआरने दर्शवली असून, दहा लाख लशींच्या मात्रा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांच्या लसीकरणाद्वारे पुणे शहर करोनामुक्त करण्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरचे (एमसीसीआयए) अध्यक्ष आणि ‘पीपीसीआर’चे समन्वयक सुधीर मेहता यांनी हा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहे. पुण्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेदिवस वाढत असल्याने बाधितांचे प्रमाण १२ टक्कय़ांवर गेले आहे. त्यामुळे लागण होऊ शकणाऱ्या नागरिकांचे तातडीने लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांमध्ये पुणे द्वितीय स्थानी आहे. त्यामुळे लस देण्यास मान्यता आणि उपलब्धता ही काळाची गरज आहे. कोविन २.० या अ‍ॅप्लिकेशन आणि संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणींमुळे लसीकरणाला खीळ बसत आहे. त्यामुळे या बाबतीत लक्ष घालून तांत्रिक अडचणी दूर कराव्यात आणि लसीकरण सुरळीत करावे. शहरात केवळ चार लसीकरण केंद्रे काही प्रमाणात कार्यान्वित होऊ शकली आहेत. खासगी रुग्णालयांना अद्याप लसीकरणाच्या वेळा उपलब्ध झालेल्या नाहीत ही काळजीची बाब आहे, असे मेहता यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारने लशीचा २५० रुपये हा दर निश्चित केला आहे. त्यामुळे नागरिकांना मोफत आणि पैसे घेऊन अशा दोन्ही पद्धतीने लस देता येईल. के ंद्र सरकारच्या निर्देशांनुसार ज्येष्ठ नागरिक आणि अन्य आजार असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तींनाच लस दिली जाईल. स्थानिक प्रशासन, राज्य शासन आणि के ंद्र शासनाच्या मदतीसाठीच ‘पीपीसीआर’ पुढाकार घेत आहे. १० लाख लशींच्या मात्रांचा निधी ‘पीपीसीआर’ उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून उभा करेल. लशीचे उत्पादन पुण्यातच सीरम इन्स्टिटय़ूटमध्ये होत असल्याने वाहतुकीचाही प्रश्न नाही. एकूण परिस्थिती विचारात घेऊन केंद्र सरकारने १० लाख लशींच्या मात्रा उपलब्ध करून देण्यास मान्यता दिल्यास पुणे शहर लवकर करोनामुक्त होऊ शकेल. त्यासाठीची सर्व व्यवस्था करण्यास पीपीसीआर तयार आहे. खासगी रुग्णालये, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रभावीपणे लसीकरण मोहीम राबवली जाईल. त्यामुळे सरकारने शहरासाठी १० लाख लशींच्या मात्रा मिळण्यास मान्यता द्यावी, असे मेहता यांनी सांगितले.