डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला एक वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांची हत्या झालेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर विविध मान्यवरांनी बुधवारी सकाळी त्यांना श्रद्धांजली वाहिली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलापासून मनोहर मंगल कार्यालयापर्यंत मोर्चा काढून ‘डॉ. दाभोलकर अमर रहे..’, ‘फुले-शाहू-आंबेडकर, आम्ही सगळे दाभोलकर..’, ‘डॉ. दाभोलकर हम शरमिंदा है, आप के कातील जिंदा है..’ अशा घोषणा देत पोलीस खाते आणि शासनाचा निषेध केला.
डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेला एक वर्षे झाल्याच्या निमित्ताने हत्या झालेल्या ठिकाणी काही वेळ स्तब्ध राहून डॉ. दाभोलकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शाह, अमोल पालेकर, सोनाली कुलकर्णी, भाई वैद्य, बाबा आढाव, डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, अतुल पेठे, अंनिसचे कार्यध्यक्ष अविनाश पाटील, नागनाथ मंजुळे, माजी न्यायाधीश हेमंत गोखले, विद्या बाळ, कॉ. किरण मोघे, अजित अभ्यंकर, सुभाष वारे, नितीन पवार यांच्यासह मोठय़ा संख्याने अंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
अंनिसच्या कार्यकर्त्यांनी लाच रंगाचा टी शर्ट परिधान केला होता. शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत मोर्चाला या ठिकाणाहून सकाळी सुरुवात झाली. महापालिकेतील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुन्हा हा मोर्चा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल, लक्ष्मी रस्ता, टिळक चौक, नवी पेठेतून सेनादत्त पोलीस चौकी, म्हात्रे पूल या मार्गे मेहेंदळे गॅरेज येथील मनोहर मंगल कार्यालयपर्यंत काढण्यात आला. या निषेध मोर्चात तरुण-तरुणी आणि शाळेतील विद्यार्थी मोठय़ा संख्याने सहभागी झाले होते.
या वेळी नसिरुद्दीन शाह म्हणाले, की एक वर्ष झाले तरी डॉ. दाभोलकरांचे मारेकरी मिळालेले नाहीत, ही शरमेची आणि धक्कादायक बाब आहे. शासनाला याबाबत काही सांगू इच्छित नाही. मात्र, मी खूपच शरमिंदा आहे.
 
ही तर संविधानावर झाडलेली गोळी- आढाव
एक वर्ष झाले, तरी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास न लागणे ही लांच्छनास्पद बाब आहे. संविधानाने सांगितलेल्या विज्ञाननिष्ठतेचा आग्रह धरणाऱ्या दाभोलकरांवर झालेला हल्ला हा संविधानावर झाडलेली गोळी आहे, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक नेते बाबा आढाव यांनी व्यक्त केली.
डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्या वेळी बाबा आढाव बोलत होते. या वेळी ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू, विद्या बाळ,  बाबा आढाव, डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, अतुल पेठे, अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, नागनाथ मंजुळे, कॉ. किरण मोघे, अजित अभ्यंकर, सुभाष वारे, अशिष खेतान आदी उपस्थित होते. विद्या बाळ म्हणाल्या, की ‘अन्यायाविरुद्ध कुरकुरत बसण्यापेक्षा परिवर्तन करू इच्छिणाऱ्यांनी त्याच्या विरुद्ध जोरकसपणे लढण्याची तयारी ठेवली पाहिजे.’ अविनाश पाटील म्हणाले, की वैचारिक प्रतिवाद करण्याची ज्यांच्यामध्ये क्षमता नव्हती, त्यांच्याकडूनच दाभोलकरांचा खून झालेला आहे. डॉक्टरांना मारले असले तरी त्यांचे विचार कधीच मारता येणार नाहीत. डॉ. हमीद दाभोलकर यांनी आभार मानले.