हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८८ वी जयंती शहर आणि परिसरात मोठय़ा उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात सोमवारी साजरी करण्यात आली.

पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते भवानी मातेचे पूजन करण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती व तांबडी जोगेश्वरी मातेचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी प्रिपरेटरी मिलेटरी स्कूल (एसएसपीएमएस), लाल महाल आणि कोथरूड येथील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृहनेता श्रीनाथ भिमाले, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले या वेळी उपस्थित होत्या.

शनिवारवाडा येथे युवावर्ग प्रतिष्ठान व छावा युवक संघटनेतर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधण्यात आले असून शिवजयंतीनिमित्त मेळावा आणि दुग्धपान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र केसरी अभिजित कटके यांचा मंडळाच्या वतीने या वेळी सत्कार करण्यात आला. शेतकरी कामगार पक्षातर्फे हिराबाग येथे विविध साहसी खेळ, पोवाडा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवजीवन अंध अपंग संस्थेतील ४० अंध मुलांना आधारकाठीचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शाखा ताडीवाला रस्ता, दलित पँथर महाराष्ट्र प्रदेश, भीम आर्मी, समता सैनिक दल, भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र. १७, भारिप बहुजन महासंघ पुणे शहर, दलित महासंघ, रिपब्लिकन मातंग सेना, विलास चौरे समाजसेवा प्रतिष्ठान, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी क्रीडा सेल आणि रिपब्लिकन संघर्ष दलातर्फे शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

राष्ट्रीय समाज पक्ष महिला विभाग आणि पुणे शहर काँग्रेस कमिटी कसबा विधानसभा मतदारसंघ आणि हमारी अपनी पार्टीतर्फे शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बिबवेवाडी येथील जय भवानी टेक्निकल इन्स्टिटय़ूट आणि जय भवानी महिला मंडळातर्फे लहान मुलांना साहित्य आणि खाऊवाटप करून शिवजयंती साजरी करण्यात आली. मुस्लीम समाजातर्फे लालमहाल येथील राजमाता जिजाऊ आणि शिवछत्रपतींच्या बालरुपातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. ३५० वर्षांनंतरही रयतेच्या मनावर छत्रपती शिवाजी महाराजांचेच राज्य आहे, अशी भावना इसाकभाई पानसरे यांनी यावेळी व्यक्त केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने अफजलखान वधाचा चित्तथरारक प्रसंग पन्नास कलाकारांनी रंगमंचावर जिवंत केला. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर आदी या वेळी उपस्थित होते. गोंधळींनी केलेल्या सादरीकरणातून शिवरायांची अफजलखान वधाची युद्धनिती उपस्थितांनी अनुभवली. युवा शाहीर प्रतीक लोखंडे यांनी पोवाडा सादर केला. नादब्रह्म ढोल ताशा ध्वजपथक ट्रस्टतर्फे वादकांनी वादनसेवा सादर केली.

शिवनेरीवर उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा सोमवारी मोठय़ा उत्साहात पार पडला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, आमदार शरद सोनावणे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी,  विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा पोलीस प्रमुख सुवेज हक आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. गडावर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवजन्मस्थळाला भेट दिली. त्या ठिकाणी सजवलेल्या पाळण्यात ठेवलेल्या बाल शिवाजीच्या मूर्तीला जोजवून पाळणा गीत म्हणण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालखी घेऊन शिवछत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर गडावरील राजमाता जिजाऊ आणि बाल शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. गडावर साहसी खेळांची प्रात्यक्षिकेही आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातून शिवप्रेमी मोठय़ा संख्येने गडावर आले होते.