दिवसभरात १८ रुग्णांचा मृत्यू

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात शनिवारी करोना संसर्गाचे १ हजार २०५ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्य़ातील एकूण रुग्णांची संख्या १० लाख ३८ हजार ९८२ झाली आहे. शनिवारी दिवसभरात पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्य़ातील कटक मंडळे आणि ग्रामीण भागात १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची एकू ण संख्या १७ हजार ५६० झाली आहे. दरम्यान, शनिवारी शहरात आढळून आलेले रुग्ण आणि झालेल्या चाचण्यांचे प्रमाण लक्षात घेता संसर्गाचे प्रमाण ३.६८ टक्के  असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार शनिवारी दिवसभरात आढळलेल्या १ हजार २०५ रुग्णांपैकी २११ रुग्ण पुणे शहरातील आहेत, तर पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये २२० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात ७७४ नवे रुग्ण आहेत. दिवसभरात मृत्युमुखी पडलेल्या १८ रुग्णांपैकी आठ रुग्ण पुणे शहरातील आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील चार रुग्ण असून जिल्ह्य़ातील सहा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्ह्य़ातील एकूण १० लाख ११ हजार ६८६ रुग्ण उपचारांनंतर बरे झाले आहेत. पुणे शहरातील ३०२ रुग्ण, तर पिंपरी-चिंचवडमधील २३५ आणि कटक मंडळे आणि ग्रामीण भागातील १०६८ अशा एकूण १ हजार ६०५ रुग्णांना उपचारांनंतर शनिवारी घरी सोडण्यात आले.

  • पुणे – २११ नवे रुग्ण, ८ मृत्यू
  • पिंपरी-चिंचवड – २२० नवे रुग्ण, ४ मृत्यू
  • उर्वरित जिल्हा- ७७४ नवे रुग्ण, ६ मृत्यू