राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहर आता टुरिस्ट हब होणार आहे. विविध योजनांच्या अंमलबजावणीने पर्यटन वाढीवर भर देण्यात येत असून टुरिस्ट हब अंतर्गत महापालिकेने १५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
पुण्याला सुमारे बाराशे वर्षांचा इतिहास आहे. पूर्वीच्या पुनवडीचा विकास होऊन आता महानगराच्या दिशेने पुण्याची वाटचाल सुरू झाली आहे. टुरिझम डेव्हलपमेंट ही शहरासाठी एक उत्तम संधी असल्याने पुणे टुरिस्ट हब करण्यात येणार असल्याची माहिती महापौर दत्ता धनकवडे यांनी शनिवारी दिली.
शहरात प्रवेश करताना आकर्षक एन्ट्री पाँईंट करावयाची योजना आहे. यामध्ये एलिव्हेटेड वॉलच्या बांधकामावर शहरातील महत्त्वपूर्ण वास्तू दर्शविणारे एनग्रेव्हिंग पॅनेल्स, सुस्वागतम करणारे फलक आकर्षक प्रकाशयोजनेच्या माध्यमातून उजळणार आहेत. छत्रपची शिवाजी आणि छत्रपती संभाजी या जुन्या पुलांची रंगरंगोटी आणि सुशोभीकरण करीत रात्रीच्या वेळी आकर्षक दिसावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. बंडगार्डन पूल वाहतुकीस बंद असून तो पादचारी पूल म्हणून वापरला जाईल, असे सांगून दत्ता धनकवडे म्हणाले, पु. ल. देशपांडे उद्यानातील एका भागामध्ये हेरिटेज व्हिलेज उभारण्याची संकल्पना आहे. वाडसदृश बांधकाम, डिस्प्ले एरिया, फूड कोर्ट साकारण्यात येणार असल्याने पर्यटकांचे आकर्षण वाढेल. उद्यानामध्ये कलाग्राम उभारण्यात येत असून कुंभारकाम, तांबट, बुरुड या पारंपरिक कलांची जोपासना करण्याच्या उद्देशातून कारागिरांना ठराविक काळासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
‘पीएमपीएमएल’मार्फत चालविल्या जाणाऱ्या ‘पुणे दर्शन’ उपक्रमासाठी दोन नवीन वातानुकूलित बसेस पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या तिकिटाचे डिझाईन आणि ब्रोशर तयार करण्यात येत आहे. गावठाणातील ऐतिहासिक पर्यटनास चालना मिळावी म्हणून छोटय़ा मिनी बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. पालिकेने शनिवारवाडा येथे सुरू केलेल्या ध्वनिप्रकाश योजनेचे आधुनिक यंत्रणेसह नूतनीकरण करण्यात येणार आहे. घोले रस्ता येथील कलादालनामध्ये शहराचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा दर्शविणारे कायमस्वरूपी हेरिटेज गॅलरी साकारण्यात येणार अससून घोरपडे घाट सुभोभित करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील काही कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून काहींची अंतिम टप्प्यात आहे, असेही धनकवडे यांनी सांगितले.