करोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यभर तुटवडा जाणवत असून पुणे शहर आणि जिल्ह्यातही हे इंजेक्शन उपलब्ध होत नाहीये. त्याच्या निषेधार्थ आज(दि.१५) सकाळपासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे.

करोनाग्रस्त रुग्णांची संख्या पुणे शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवा कमी पडताना दिसत असून ज्या रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे अशांना रेमडेसिवीर इंजेक्शन देणे आवश्यक आहे. मात्र, हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने, अनेक नातेवाईकांना इंजेक्शन मिळविण्यासाठी पुणे शहरात अनेक ठिकाणी वणवण फिरावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात प्रत्येक रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध करुन दिले जाईल, असे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र तो साठाही संपला असल्याने, आज अखेर नातेवाइकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

‘शहरातील अनेक केमिस्ट शॉपमध्ये जाऊन आम्ही इंजेक्शनची मागणी करीत आहोत. मात्र कुठेही इंजेक्शन मिळत नाही. रुग्णालायामध्ये आम्ही इंजेक्शन देऊ असे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले होते. मात्र ते देखील उपलब्ध झाले नाही. त्यामुळे आता आम्ही काय करायचे, यामुळे आम्ही सर्व जण जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर आंदोलनास बसत आहोत. जोवर इंजेक्शन मिळत नाही. तोवर जागेवरून उठणार नाही’, अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे.