पुण्यातील एका डॉक्टरची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. करोनाच्या विषाणूविरोधात लढणाऱ्या या डॉक्टरच्याच घरात करोनानं शिरकाव केला. त्यात वडिलांचं निधन झालं. तर आई आणि भाऊ रुग्णालयात उपचार घेत आहेत. पण, वडिलांच्या जाण्याचं दुःख बाजूला सारत हा डॉक्टर लगेचच करोना रुग्णांच्या सेवेत रुजू झाला. ‘आराम करत रुग्णांच्या वेदना बघू शकत नाही,’ असं सांगत डॉ. मुकुंद सध्या रुग्णांवर उपचार करत आहेत.

पुण्यातील संजीवनी रुग्णालयातील डॉ. मुकुंद यांच्या वडिलांचा करोनामुळे मृत्यू झाला. तर आई आणि भाऊ रुग्णालयात उपचार घेत आहे. करोनाच्या थैमानानं घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. तर आई आणि भाऊही रुग्णालयात दाखल झाले. अशा या दुःखाच्या आणि अडचणीच्या परिस्थितीत अडकून न पडता डॉ. मुकुंद यांनी कर्तव्याला प्राधान्य दिलं. वडिलांच्या मृत्यूनंतर लगेचच ते करोना रुग्णांच्या सेवेत परतले. ‘परिस्थिती खूप अवघड आहे. रुग्णांच्या वेदना बघत आपण आराम करू शकत नाही,” असं डॉ. मुकुंद यांनी सांगितलं.

Pune Doctor Continues Duty After Father's Death

डॉ. मुकुंद यांच्या या कर्तव्यभानाचं कौतुक होऊ लागलं आहे. अनेकांनी त्यांना अविरत सेवेबद्दल सॅल्यूट केला आहे. तर काही जणांनी त्यांच्या आई आणि भावाची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

Pune Doctor Continues Duty After Father's Death

करोनाच्या दुसऱ्या लाटेनं महाराष्ट्रासह देशाला नव्या संकटात ढकललं आहे. हळूहळू पूर्वपदावर येत असलेलं जनजीवन पुन्हा एकदा कोलमडून पडलं आहे. पुण्यातील परिस्थितीही गंभीर असून, मिनी लॉकडाउन, कडक निर्बंधांसारख्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, सोमवारी पुणे जिल्ह्यात करोनाच्या ७६६२ नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या आठ लाख ६८ हजार ५०६ झाली आहे. दिवसभरात पुणे जिल्ह्यातील १५० रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला असून, त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या १३,५४६ झाली आहे.