“करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात विशेष दक्षता घेतली जात आहे. त्याच दरम्यान दुबईहून पुण्यात आलेल्या दोन प्रवाशांना या आजाराची लागण झाली आहे,” अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ दिपक म्हैसेकर पत्रकार परिषदेत देण्यात आली. “दुबईमध्ये ४० जणांचा ग्रुप फिरण्यास गेला होता. तो देश केंद्र शासनाने जाहीर केलेल्या बाधित देशांच्या यादीमध्ये नव्हता. त्यामुळे संशयित रुग्ण १ मार्चला भारतात परत आल्यानंतर त्यांचे विलगीकरण करण्यात आले नाही,” स्पष्टीकरण त्यांनी दिले.

यावेळी दिपक म्हैसेकर म्हणाले की, “दोन्ही व्यक्तींच्या भारतात परत आल्यानंतर संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या ठिकाणांची माहिती घेण्यात आली आहे. या दोन्ही रूग्णांचे कुटुंबीय, मित्र परिवार तसेच त्यांचे कार्यालयीन ठिकाणी असलेल्या सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे. आतापर्यत रूग्णांच्या कुंटुंबातील तीन व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.” “या दोन्ही व्यक्तींनी ज्या व्यक्तीच्या ओला टॅक्सी ने मुंबई वरून पुण्याला प्रवास केला. त्या टॅक्सीवाल्याची माहिती घेण्यात आली असून त्या व्यक्तीला सोमवापी रात्री दवाखान्यामध्ये दाखल करून घेण्यात आले आहे,” असंही त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, “करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यासाठी पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये महसूल, आरोग्य, पोलीस आणि दोन्ही महानगरपालिकाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सदर पथकाद्वारे वरील दोन्ही रुग्ण ज्या विभागामध्ये किंवा परिसरामध्ये गेले असतील त्या ठिकाणी कोरोना बाधित अथवा संशयित व्यक्ती आढळून येत असल्यास त्याची खातरजमा करण्यात येणार आहे. त्याच बरोबर दोन्ही महानगरपालिका क्षेत्रामध्ये २१ ठिकाणी २०७ बेडसह अतिदक्षता विभागाच्या सुविधा तसेच विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे.”