केंद्राच्या एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रम व दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेतील पहिल्या टप्प्यामध्ये पुणे विभागात २१० कोटी ६४ लाख रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. या कामांना मंजुरीही मिळाली असून, येत्या महिनाभरात महावितरणच्या मुख्यालयातून निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा विद्युत समितीच्या बठकीत देण्यात आली.
जिल्हा विद्युत समितीचे अध्यक्ष खासदार शिवाजीराव आढळराव पाटील बठकीच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार विजय काळे, भीमराव तापकिर, मेधा कुलकर्णी, गौतम चाबुकस्वार, सुरेश गोरे, दत्तात्रय भरणे, शरद सोनवणे, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रदीप कंद, महावितरणचे मुख्य अभियंता रामराव मुंडे आदी बैठकीला उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील वीजस्थिती, केंद्र शासनाच्या विविध योजना व त्यातील कामांच्या माहितीचे मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी बैठकीत सादरीकरण केले. यात पुणे जिल्ह्यासाठी केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रमामध्ये १४५ कोटी ३१ लाख व दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेत ६४ कोटी ३३ लाखांची विविध कामे पहिल्या टप्प्यात मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील आमदारांनी केलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीबाबत तसेच वीजग्राहकांच्या तक्रारी निवारणाबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा विद्युत समितीचे अध्यक्ष आढळराव पाटील यांनी दिले.
पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रात नवीन वीजजोडण्या देण्याची मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी केली, तर जिल्ह्यातील बिबटय़ाचा वावर असलेल्या क्षेत्रातील ६३ गावांमध्ये शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्याबाबत आढळराव पाटील व आमदार सोनवणे यांनी सूचना केली. याबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.