पुणे महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी केली आहे, असे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली उमेदवार यादी आठवडाभरात जाहीर होईल, अशी माहिती पक्षाच्या नेत्या आणि खासदार वंदना चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान, सत्तेच्या लालसेपोटी राष्ट्रवादी काँग्रेसमधून इतर पक्षांत गेलेल्या नगरसेवकांना महापालिका निवडणुकीत पुणेकर नक्कीच जागा दाखवतील, असेही त्या म्हणाल्या.

मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या असलेल्या पुणे महापालिकेची निवडणूकही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपसह शिवसेनेनेही प्रतिष्ठेची केली आहे. पुणे महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी प्रत्येक पक्षाने रणनिती आखली आहे. युती-आघाडीबाबत अनिश्चितता असल्याने सर्वांनीच स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. प्रत्येक पक्षांमध्ये ‘इनकमिंग’ आणि ‘आऊटगोईंग’ सुरू झाले आहे. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार वंदना चव्हाण यांनी निवडणुकांच्या तोंडावर ‘पक्षांतर’ करणाऱ्या नगरसेवकांवर निशाणा साधला आहे. पक्षाला शहरात चांगले वातावरण आहे. सध्या भाजपकडे तत्वशून्य लोक गेले आहेत. पुणेकर नागरिक आगामी महापालिकेत त्यांची जागा नक्कीच दाखवतील, असा थेट हल्ला त्यांनी चढवला आहे. सत्तेच्या लालसेपोटी ते भाजपत गेले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. पुणे महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सत्ता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसमध्ये आघाडीबाबत कोणतीही चर्चा सुरू नसताना, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. पक्षातर्फे आठवडाभरात उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती चव्हाण यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. या मुलाखतींना प्रत्येक घटकांतील उमेदवारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पक्षासाठी चांगले वातावरण आहे, असेही त्यांनी सांगितले.