राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संपावर गेले असून सरकारकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. शेतकरी संपामुळे बाजारात पालेभाज्या आणि दुधाचा तुटवडा जाणवू लागला आहे. या मलाची विक्री सध्या बाजारात दुपटीने होत आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत पोलीस बंदोबस्तात भाजीपाला आणला जाणार आहे. त्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच दुधाचाही तुटवडा जाणवत असून, मागणीनुसार ५० टक्के दुधाचे वितरण करण्याचा निर्णय कात्रज डेअरीच्या व्यवस्थापनाने घेतला आहे.

याबाबत, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपमुख्य प्रशासक भूषण तुपे म्हणाले, की ‘बाजार समितीत काही प्रमाणात भाजीपाल्याची आवक झाली आहे. कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून बाजार समितीच्या आवारात पोलीस बंदोबस्तात शेतीमाल आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.’ शहरातील दुधाच्या तुटवड्याबाबत कात्रज दूध डेअरीचे विवेक क्षीरसागर म्हणाले, की ‘पुणे शहरात जवळपास १५ लाख लिटर दुधाची आवश्यकता असून, कात्रज डेअरीमध्ये दररोज सव्वा लाख लिटर दूध संकलित केले जाते. १ जूनला ५० टक्के, २ जूनला २५ टक्के आणि सकाळी संप मागे घेतल्याच्या चर्चेमुळे ७० टक्के संकलन झाले आहे. मात्र दुपारनंतर वेगळया चर्चेमुळे दूध संकलनावर त्याचा परिणाम झाला असून या सर्व बाबींचा विचार करून मागणीच्या ५० टक्के दुधाचे वितरण केले जाणार आहे.’