जलतरण तलावात पोहायला गेलेल्या संगणक अभियंत्याचा चक्कर येऊन तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी पिंपरी-चिंचवडच्या थेरगाव येथे घडली आहे. वैभव आचल जैन (वय-२३) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो हिंजवडीत एका नामांकीत कंपनीत कामाला होता. वेळीच जीवरक्षकांनी पाहिले असते तर वैभवचा जीव वाचला असता, अशी हळहळ स्थानिकांनी व्यक्त केली. या घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव हा शनिवारी सायंकाळी थेरगाव येथील महापालिकेच्या खिंवसरा जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान, तो पोहण्याची तयारी करून जलतरण तलावाच्या कडेला थांबला होता. अचानक वैभवला चक्कर आली आणि पाच फूट खोल जलतरण तलावातील पाण्यात पडला त्यापूर्वी त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. दुर्दैव म्हणजे त्याला पडताना कोणीही पाहिले नाही, पडल्यानंतर दहा मिनिटांनी उपस्थित जीवरक्षकांनी पाण्यातून बाहेर काढले. तो पाण्यात निपचीप पडलेला होता, त्याची शुद्ध हरपलेली होती.

तातडीने औंध येथील शासकीय रुग्णालयात वैभवला दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली. वैभव हा हिंजवडी मधील एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत होता. सदर घटनेची माहिती जीवरक्षक सतीश लक्ष्मण कदम यांनी दिली होती. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.