पुणे : कोंढवा भागातून तीन वर्षांच्या बालकाचे अपहरण केल्याच्या प्रकरणात एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली. बालकाचे अपहरण करण्यात आल्यानंतर पोलिसांनी कोंढवा भागातील ११० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पडताळले आणि अपहरणकर्त्यांचा माग काढला.  पुरंदर तालुक्यातील वीर येथून एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून बालकाची सुखरूप सुटका करण्यात आली असून बालकाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या प्रकरणी लाला शिवाजी सूर्यवंशी (वय ३८,रा. इंदिरा वसाहत, औंध, मूळ रा. नंदगाव, जि. उस्मानाबाद) आणि सुनिता लक्ष्मण बिनावत (वय ३०) यांना अटक करण्यात आली आहे. गोविंद पांडुरंग आडे (वय २६,रा. आईमाता मंदिरा जवळ, कोंढवा) यांनी यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आडे यांचा तीन वर्षांचा मुलगा अविनाश दोन दिवसांपूर्वी घराबाहेर खेळत होता. त्यानंतर तो अचानक बेपत्ता झाला. आडे मजुरी करतात. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. ज्या भागातून बालकाचे अपहरण झाले होते त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी पडताळले. त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला, अशी माहिती परिमंडल पाचचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड आणि सहाय्यक आयुक्त मिलिंद पाटील यांनी दिली.

कोंढवा, मार्केटयार्ड, स्वारगेट, शिवाजीनगर, वानवडी, लष्कर, पुणे स्टेशन भागातील चित्रीकरण पडताळण्यात आले. तेव्हा सूर्यवंशी आणि बिनावत यांची नावे निष्पन्न  झाली. दोघेजण मजुरी करत असल्याची माहिती मिळाली. तांत्रिक तपासात दोघेजण पुरंदर तालुक्यातील वीर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले. दोघांना ताब्यात घेण्यात आले तसेच त्यांच्या ताब्यातून बालकाची सुटका करण्यात आली. बालकाला त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, महादेव कुंभार, चेतन मोरे, नितीन बोधे, संतोष शिंदे, राजस शेख,   योगेश कुंभार आदींनी ही कारवाई केली.

बालकाच्या अपहरण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करण्यात आली. तेव्हा बालकाचे अपहरण  भीक मागण्यासाठी करण्यात आल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. आरोपी बिनावत आणि सूर्यवंशी यांनी अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे.

– प्रकाश गायकवाड, पोलीस उपायुक्त, परिमंडल ५