पुण्यात गेल्या आठवड्यात अंबिल ओढ्याजवळील चेंबरमध्ये पडून गणेश किशोर चांदणे या १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या मुलाच्या कुटुंबीयांना महापालिका प्रशासनाच्या वतीने तीन लाख रुपये भरपाई देण्यात येणार असल्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले. पुणे महापालिकेच्या आज, मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत त्यांनी हे आदेश दिले.

पुणे येथे गेल्या आठवड्यात अंबिल ओढ्यात बॉल काढताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढून गणेश किशोर चांदणे हा तेथील चेंबरमध्ये पडला होता. त्याचा मृतदेह कसबा पंपिंग स्टेशनमध्ये सापडला होता. या घटनेला महापालिका प्रशासन जबाबदार असून, त्याच्या कुटुंबीयाना आर्थिक मदत केली जावी, संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली होती. त्यावर महापौर प्रशांत जगताप यानी महापालिकेच्या वतीने मृत मुलाच्या कुटुंबीयांना तीन लाख रुपये देण्यात येणार असल्याचे सर्वसाधारण सभेत जाहीर केले.

पुणे महापालिकेची आज सर्वसाधारण सभा झाली. सभेच्या सुरुवातीलाच अंबिल ओढा भागातील स्थानिक नगरसेवक धनंजय जाधव आणि मनीषा घाटे यानी गणेश चांदणे याच्या मृत्युला महापालिका कारणीभूत आहे. या घटनेला पाच दिवस उलटूनही घटनास्थळाला महापौर किंवा महापालिका आयुक्तांनी भेट देऊन पाहणी केली नाही. तसेच घटना घडल्यावर तेथे महापालिकेचा एकही अधिकारी नव्हता, असा आरोप त्यांनी केला. अग्निशमन दलाचे आधिकारी २४ तास काम करत होते आणि मुलाचा तपास करत होते. या घटनेचे गांभीर्य महापालिका प्रशासनाला नाही, यातून स्पष्ट होते, असा आरोपही घाटे आणि जाधव यांनी केला. ज्या चेंबरमध्ये मुलगा पडला, त्याला भगदाड पडले होते. ते कोणी पाडले? त्याच्या कामात हलगर्जीपणा झाला, असा आरोप त्यांनी केला. आमच्या खात्यामार्फत चेंबरचे काम केले नव्हते, तर ते काम कोणी केले, असा सवाल त्यांनी उपस्थित करून पालिका प्रशासनाला कोंडीत पकडले. दरम्यान, संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, गणेश चांदणे याच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी या सभेत केली.

नगरसेवकांनी केलेल्या आरोपांवर महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी उत्तर दिले. अंबिल ओढा घटनेचा तपास त्रिस्तरीय समितीमार्फत करण्यात येणार असून, त्याचा अहवाल आल्यानंतर रवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अंबिल ओढा घटनास्थळाला महापालिका आयुक्तांसमवेत भेट देण्यात येणार आहे. तसेच गणेश चांदणे याच्या कुटुंबीयांना मदत केली जाणार आहे, असे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले.