पुण्याची पाणीकपात रद्द करण्यावरून वादंग
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १५ टीएमसी एवढा पाणीसाठा झाल्यामुळे सोमवार (१८ जुलै) पासून पुण्याला दररोज पाणीपुरवठा सुरू करावा, असा आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी शनिवारी सायंकाळी आयुक्तांना दिला. मात्र, परिस्थितीचा विचार करून, सर्वाना विश्वासात घेऊन नंतरच यासंबंधीचा निर्णय करता येईल, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली असल्यामुळे पाणीकपात तातडीने रद्द होणार नसल्याचे चित्र आहे.
पुण्यात सप्टेंबर २०१५ पासून पाणीकपात करण्यात आली असून, तेव्हापासून एक दिवसाआड पाणी दिले जात आहे. ही कपात रद्द करण्यासंबंधीचे सूतोवाच शनिवारी दुपारी एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले. गुरुजन सत्कार समारंभात बोलताना पवार यांनी ‘दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर पुणेकरांनी गेले वर्षभर काटकरीने पाणी वापरले. यंदा पुरेसा पाऊस पडला नसला, तरी धरणात समाधानकारक साठा आहे. अशा परिस्थितीत पुणेकरांना दिलासा मिळावा यासाठी शहरात दररोज पाणीपुरवठा सुरू करा,’ असा आदेश महापौरांना दिला.
या कार्यक्रमानंतर महापौरांनी तातडीने पक्षनेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीत धरणांमधील पाणीसाठय़ाबाबत त्यांनी सर्वाशी चर्चा केली. तसेच त्यांनी आयुक्तांबरोबरही चर्चा केली. धरणांमध्ये १५ टीएमसी पाणीसाठा असून, पावसाळ्याचे आणखी दोन महिने आहेत. त्यामुळे सोमवार (१८ जुलै) पासून शहराला दररोज पाणीपुरवठा करा, असा आदेश महापौरांनी आयुक्त कुणाल कुमार यांना दिला.
महापौरांनी हा आदेश दिला असला, तरी आयुक्तांनी मात्र लगेचच या निर्णयाची अंमलबजावणी करणे शक्य होणार नसल्याचे पत्रकारांना सांगितले. पुणे शहराला किती पाणी लागणार आहे तसेच शेतीसाठी किती पाणी सोडावे लागणार आहे, या आणि अशा अन्य बाबींचा विचार करून तसेच सर्वाना विश्वासात घेऊन, संबंधित सर्वाशी चर्चा करून नंतरच निर्णय घेणे सयुक्तिक ठरेल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. धरणांमधील पाणीसाठय़ाचा आढावा घेऊन त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे महापौरांच्या घोषणेनुसार सोमवारपासून पाणीकपात रद्द होण्याची शक्यता तूर्त तरी नाही. सोमवारपासून दररोज पाणी न सोडल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीला शासन आणि महापालिका प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा महापौरांनी आयुक्तांनी घेतलेल्या भूमिकेबाबत दिला आहे.
वादाचा घटनाक्रम
* सायंकाळी ५ – पाणीकपात मागे घेण्याचा अजित पवार यांचा महापौरांना आदेश
* सायंकाळी ७ – पाणीकपात रद्द करण्याबाबत महापौरांची पक्षनेत्यांशी चर्चा, पाणीकपात रद्द करण्याचा महापौरांचा आयुक्तांना आदेश
* रात्री ८.३० – सोमवारपासून दररोज पाणीपुरवठा सुरू करणे शक्य नाही- आयुक्तांची भूमिका
* रात्री ९.४५ – सोमवारपासून दररोज पाणी न सोडल्यास होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार- महापौरांचा इशारा