धुवाधार पावसानंतर २६ जुलैपासून विस्कळीत झालेली पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक गेल्या आठ दिवसांपासून पूर्णपणे ठप्प आहे. १६ ऑगस्टपर्यंत ही वाहतूक बंद राहणार असल्याने बंदचा कालावधी १२ दिवसांवर जाणार आहे.

मध्य रेल्वेच्या इतिहासात पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक इतक्या मोठय़ा कालावधीसाठी बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचप्रमाणे लांब पल्ल्याच्या विविध गाडय़ाही बंद असून, अनेक गाडय़ा अंशत: रद्द आहेत. अशा गाडय़ांची संख्या दीडशेच्या आसपास आहे.

जुलैच्या शेवटच्या आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ामध्ये मुंबई, पुण्यासह मध्य महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाली. जुलैमध्ये घाट क्षेत्रात दोनदा मालगाडीचे डबे घसरले. मंकी हिल, ठाकूरवाडी भागात दरडी कोसळल्या. त्यामुळे घाटक्षेत्रातील दुरुस्तीसाठी पुणे-मुंबई प्रगती, डेक्कन एक्स्प्रेससह पॅसेंजर रद्द करण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, याच कालावधीत रोजच जोरदार पाऊस सुरू झाल्याने पुणे-मुंबई दरम्यान सर्वच गाडय़ांची वाहतूक विस्कळीत झाली. ऑगस्टच्या सुरुवातीलाही पावसाचे प्रमाण वाढले. कर्जत विभागात लोहमार्गावरून पाणी गेले. सिग्नल यंत्रणा कोलमडली आणि घाटात सातत्याने दरडी कोसळू लागल्या. त्यामुळे रेल्वेने ऑगस्टच्या पहिल्याच आठवडय़ापासून पुणे-मुंबई दरम्यानच्या सर्व गाडय़ा बंद ठेवण्यात आल्याचे जाहीर केले.

सद्यस्थितीत डेक्कन क्वीन, इंद्रायणी, इंटरसिटी, सिंहगड, प्रगती, डेक्कन एक्स्प्रेस आदी सर्वच गाडय़ा बंद आहेत. कोयना, सह्यद्री एक्स्पेसही १६ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहेत. तोवर १२ दिवसांचा कालावधी होणार आहे. पाच वर्षांपूर्वी कामशेत येथे लोहमार्गाखालील भराव वाहून गेल्याने सात ते आठ दिवस वाहतूक बंद होती. २०१५ मध्ये मुंबईत मिठी नदीला पूर आल्याने सात दिवस वाहतूक बंद होती. यंदा मात्र पुणे-मुंबई रेल्वे बंदचा कालावधी ऐतिहासिक ठरला आहे.