राज्यभरात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. दररोज मोठ्यांसख्येने करोनाबाधित वाढत असल्याने, आरोग्य यंत्रणा कोलडमली आहे. रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड आदींसह रेमडेसिवीर इंजेक्शन, लसींचा तुटवडा निर्माण झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील ससून रूग्णालयातील बंद अवस्थेतील २५ व्हेंटिलेटर पैकी २१ मनपाकडून सुरू करण्यात आले आहेत.

मागील वर्षी पीएम केअर फंडच्या माध्यमातून ससून रुग्णालयाला देण्यात आलेल्या काही व्हेंटिलेटरपैकी २५ बंद असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर तातडीन महापालिकेच्या माध्यमातून यापैकी २१ कार्यान्वित करण्यात आली असून, उर्वरती चार व्हेंटिलेटरचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. आता हे व्हेंटिलेटर महापालिका रुग्णालय आणि ससूनमध्ये वापरण्यात येणार आहेत. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या ससूनमध्ये काही व्हेंटिलेटर बंद असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर हे व्हेंटिलेटर महापालिकेने ताब्यात घेतले आणि आठ दिवसांत सुरू देखील केले आहे. किरकोळ काही कारणांसाठी आता व्हेंटिलेटर बंद अवस्थेत पडून राहणे. हे चुकीचे असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

तसेच ते पुढे म्हणाले की, आता दुरुस्त करण्यात आलेल्या व्हेंटिलेटरपैकी आठ बिबवेवाडी येथील रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आले असून, इतर व्हेंटिलेटर पुणे महानगरपालिका, ससूनमध्ये कार्यान्वित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.