मुंबईनंतर देशात झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. शहराचा विकास करत असताना प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. पुणे महानगरपालिकेच्‍या नवीन विस्‍तारीत इमारतीचे उद्घाटन उपराष्‍ट्रपती व्‍यंकय्या नायडू यांच्‍या हस्‍ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, सध्या लोकांना शारीरिक श्रम नसल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. तसे होऊ नये म्हणून सायकल चालविण्यासारखे व्यायाम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी शहरात सायकल ट्रॅक्सची आवश्यकता आहे. आरोग्य हीच संपत्ती असून सध्या मधुमेह, हायपर टेन्शन यासारखे आजार वाढत आहेत. असे असल्यास संपत्तीचा काय उपयोग असा सवालही नायडू यांनी उपस्थित केला. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पालिकेनेही पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला केंद्रीय मनुष्‍यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, राज्‍याचे सामाजिक न्‍याय राज्‍यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा व जलसंधारण राज्‍यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिध्दार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक आदी उपस्थित होते.

पुणे शहराने केंद्र आणि राज्यशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार शहर निर्माण करावे. तसेच या शहराचा स्मार्टसिटी योजनेत समावेश झाला आहे. नागरिकांना प्राथमिक गरजा उपलब्ध करुन देतानाच ऑनलाईन सुविधा पुरविण्याच्या प्रयत्न केला जावा. रस्ते तसेच नद्यांवरील अतिक्रमणे दूर व्हावीत, नद्यांमध्ये सांडपाणी सोडले जावू नये. यासाठी जनजागृती करावी असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले. पुणे शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून या शहराची ओळख आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहातून जनहिताचे चांगले निर्णय सामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न व्हावा अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे महानगरपालिकेने या सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिल्याने त्याचे अधिक महत्व वाढले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार चालवताना नेहमीच रयतेचा विचार केला. सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे या सभागृहातून त्यांचे विचार आणि आचार अंमलात आणून कामकाज चालावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.