भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मुंबई-पुणे-नाशिक हा रेल्वे मार्गाचा सुवर्णत्रिकोण पूर्ण करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या पुणे ते नाशिक या नव्या मध्यम अतिजलद रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यास राज्य शासनाने अर्थसंकल्पात मंजुरी दिली. त्यामुळे हा प्रकल्प आता अधिक वेगवान होऊ शकणार आहे. यापूर्वी या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांकडून देण्यात आल्या होत्या.

पुणे-नाशिकसाठी नव्या रेल्वे मार्गाबाबत १९९२ पासूनच सर्वेक्षण करण्यात येत आहे. रेल्वे बोर्डाकडून यापूर्वी या प्रकल्पाचा आराखडा करण्यात आला होता. मात्र, महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनची (महारेल) स्थापना झाल्यानंतर प्रकल्पाबाबत मध्यम अतिजलद रेल्वेच्या दृष्टीने आराखडा सादर करण्यात आला. त्यानुसार या प्रकल्पाचे काम हाती घेण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. पुणे ते नाशिक या नव्या रेल्वे मार्गाची प्रस्ताविक लांबी २३५ किलोमीटर असून, त्यासाठी १६ हजार ३९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्य आणि रेल्वेही त्यासाठी खर्चाचा वाटा उचलणार आहेत.

पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्य़ांतून हा रेल्वे मार्ग जाणार आहे. या तीनही जिल्ह्य़ांत १४७० हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे. पुणे जिल्ह्य़ात हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यांतील सुमारे ५७५ हेक्टर जागा संपादित केली जाणार आहे. भूसंपादनाची ही प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वीच विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. संबंधित जमिनी ताब्यात घेण्याबाबत रेल्वे विभागाकडून प्रस्तावही दाखल करण्यात आले असून, भूसंपादनासाठी १५०० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.