भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरून विधानसभा मतदारासंघाचे आमदार चंद्रकांत पाटील पुन्हा एका नव्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी हे विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं होतं, असा दावा पाटील यांनी भाजपाच्या कार्यक्रमात केला आहे.

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तरुणाईला जोडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या युवा वॉरियर्स अभियानाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार भीमराव तापकीर, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. “नरेंद्र मोदी यांनी सर्व मुसलमानांना स्थान दिले असून, अब्दुल कलाम यांना देखील राष्ट्रपती त्यांनी केल आहे. त्यांना राष्ट्रपती मुस्लिम म्हणून केल नव्हते, तर एक कर्तृत्ववान, संशोधक म्हणून त्यांना केलं होतं,” असं पाटील यांनी म्हटलं आहे. पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओही फिरत असून, त्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटलबिहारी वाजपेयी आदी महापुरुषांचे कर्तृत्व या युवापिढीला समजून घेण्याची गरज आहे. आज समाजात आजूबाजूला अनेक अडचणी, प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी आपण काय योगदान देऊ शकतो, याचा विचार युवांनी केला पाहिजे. १८ ते २५ या वयोगटातील तरुणाईचे सळसळते रक्त असते. त्याला योग्य दिशा देऊन राष्ट्रहितासाठी ही शक्ती कार्यान्वित करायला हवी. स्वातंत्र्य लढ्यात युवकांचे मोठे योगदान होते. तसेच योगदान आजही या तरुणाईने द्यायला हवे. या पिढीला खरा इतिहास सांगण्याची तसेच राष्ट्राशी, इतिहासाशी आणि संस्कृतीशी जोडण्याचे काम युवा मोर्चा करत आहे,” असं पाटील म्हणाले.