करोनाकाळात नोकरी नवीन संधी निर्माण झाल्या तर नाहीतच, उलट अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. हाताला काम मिळावं म्हणून जो तो धडपडताना दिसतोय… पुण्यातील ३० वर्षीय तरुणीही जॉब मिळवण्यासाठी संधी असेल तिथे अर्ज करत होती. अनेक कंपन्यांमध्ये अर्ज करूनही नोकरी मिळत नसल्यानं तरुणीला नैराश्य आलं. त्या निराशेच्या भावनेतून मग तिने आत्महत्या करण्याचं मनाशी ठरवलं. आयुष्याचा प्रवास संपवण्यासाठी ती घराच्या बाहेर पडली. पण, एका फेसबुक पोस्टने तिला परत नव्यानं आयुष्य जगण्याची उमेद दिली.

झालं असं की, कोथरूड परिसरातील एका सोसायटीमध्ये राहणारी ३० वर्षीय तरुणीचं एम.ए. पर्यंत शिक्षण झालेलं होते. त्यामुळे ती नोकरीच्या शोधात होती. दररोज अनेक ठिकाणी जाऊन मुलाखती देणं, तसेच अर्ज देखील ती तरुणी करत होती. एवढे प्रयत्न करून देखील, नोकरी मिळत नसल्याने तिला हळूहळू नैराश्यानं ग्रासलं. प्रचंड नैराश्य आल्याने त्या तरुणीनं फेसबुकवर पोस्ट लिहिली. “मी आत्महत्या करायला जात आहे,” अशी पोस्ट करून तिने एका मित्राला फोन केला. “तुला फोन द्यायचा आहे. मला भेटण्यास ये,” असं तिने मित्राला सांगितलं. त्यानंतर ती तरुणी मित्राला सांगितलेल्या ठिकाणी भेटण्यास गेली.

आणखी वाचा- मित्राच्या मुलीवरच केला बलात्कार, जिवंत पुरण्याचाही केला प्रयत्न; मध्य प्रदेशमधील धक्कादायक घटना

याच दरम्यान तिने फेसबुकवर लिहिलेली आत्महत्येची पोस्ट अनेकांनी पहिली. याबाबतची माहिती कुटुंबातील व्यक्तीना मिळाली. त्यानंतर तिच्या सर्व मित्र मैत्रिणींकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. पोलिसांना देखील याबाबत कळविण्यात आलं. पोलिसांनी तिचं मोबाईल लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकेशन शोधण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्याचवेळी एका मित्राने तिच्या कुटुंबीयांना सांगितले की, “ती मला एका ठिकाणी भेटण्यास येणार आहे.” याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली. त्यानंतर तो मित्र ठरलेल्या ठिकाणी गेला. त्याचबरोबर दामिनी पथकही तिथे गेलं. काही वेळाने ती तरुणी तिथे पोहोचली. तरुणी येताच दामिनी पथकाने तिला ताब्यात घेतले. त्यानंतर तरुणीने सर्व माहिती सांगितली. तरुणीचं ऐकून घेतल्यानंतर भरोसा सेलनं तिचं समुपदेशन केलं आणि नंतर कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. भरोसा विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे यांनी या घटनेची माहिती दिली.