पुण्याला माहिती आहे की तो विनोद होता, पुणेकर स्वतः ही विनोद करतात. यावर तुम्ही वेगळा अर्थ लावू नका, पुणेकरांनी आपण केलेलं ‘आफ्टरनून लाईफ’च वक्तव्य गंमत म्हणून घ्यावं, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं.

ठाकरे म्हणाले, पुणे शहराची जगभरात एक वेगळी ओळख असून या शहरात पर्यावरणप्रेमी मोठ्या प्रमाणावर आहेत. या शहराला पर्यावरणाच्या दृष्टीने २०३० कार्बन मुक्त करणे हे आमचं लक्ष्य आहे.

राज्याच्या पर्यावरणाचा विचार करता, येत्या काळात शहरांतील रस्त्यांवर इलेक्ट्रिक आणि हायब्रीड बस धावतील. यावर आमच्या सरकारच लक्ष केंद्रित असणार आहे. आघाडीचे सरकार याबाबत सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मुंबईत नाईट लाईफ सुरु करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर या निर्णयाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत आदित्य ठाकरे यांच्या मिष्किल टिप्पणीने उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला होता. नाईट लाईफचा निर्णय संपूर्ण राज्यात किंवा पुण्यात लागू होणार का? असा प्रश्न यावेळी आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला होता. यावर आदित्य ठाकरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता पुण्यात पहिले ‘आफ्टरनून लाईफ’ सुरु करुयात, अशी टिप्पणी केली होती.