कात्रज येथून निगडी येथे जाणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसला आज, गुरुवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखून बसमधील २५ ते ३० प्रवाशांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने बसला आग लागली, अशी माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिका परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) ची बस कात्रजहून निगडी येथे जात होती. ती दुपारी पावणे चारच्या सुमारास चांदणी चौकात आली असता, बसच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखून बसमधील २५ ते ३० प्रवाशांना सूचना दिली. त्यांना बाहेर काढले. काही वेळातच बसने पेट घेतला. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान अवघ्या १० मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग विझवण्यास सुरूवात केली. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीमुळे बसचे मोठे नुकसान झाले आहे. बसला आग लागल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.